प्रवाशांची सुरक्षा राम भरोसे
| पाली | प्रतिनिधी |
सुधागड तालुक्यात शुक्रवारी (दि. 25) मुसळधार पाऊस झाल्याने भेरव गावाजवळील खुरावले फाटा येथील अंबा नदीवरील पुलावरून सकाळी पाणी वाहात होते. यावेळी वाहत्या पाण्यातून पुलाच्या दोन्ही बाजूला जीव धोक्यात घालून वाहने पाण्यातून जात होती. तसेच नागरिकदेखील चालत गेले.
सकाळी 10 वाजेच्या सुमारास भेरव पुलावरून पाणी गेल्याने रस्त्याच्या दोन्ही बाजूला वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. या पुलाच्या पलीकडून पाली व खोपोलीला जोडणारा रस्ता आहे. तसेच दुसऱ्या बाजूने भेरव, वाघोशी, महागाव व पेण आदी गावांकडे जाणारा रस्ता आहे. मात्र, बराच वेळ वाट पाहूनदेखील पुलावरचे पाणी कमी होत नसल्याने तेथील अतिउत्साही वाहन चालकांनी आपली वाहने वाहत्या पाण्यातून नेण्याचा धोकादायक स्टंट केला. हा प्रवास धोकादायक होता, कारण पाण्याचा प्रवाह व जोर वाढला असता तर जीवावर बेतले असते. खुरावले फाटा येथील पुलावरून पावसाळ्यात नेहमी पाणी जात असते. येथील प्रवासी असुरक्षित प्रवास करीत असतात.
पुलावरून पाणी जात असतांना पुलाच्या दोन्ही बाजूला पोलीस किंवा होमगार्ड तैनात करण्यात यावे, तसेच वाहतूक थांबवण्यात यावी किंवा पुलाची उंची तरी वाढवण्यात यावी, असे येथील स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे.






