जनतेची पाण्यासाठी वणवण
| कोलाड | विश्वास निकम |
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील रस्त्याची बिकट अवस्था पाहता रस्त्यावर प्रचंड धुरळा पडलेला असून, या धुरळ्याला पर्याय म्हणून मुंबई-गोवा महामार्गावर वाकण ते इंदापूरदरम्यान पाण्याची फवारणी केली जात आहे. दररोज लाखो लीटर पाणी केवळ धुरळ्यावर वाया जात आहे, त्यामुळे हा जगातील पहिला राष्ट्रीय महामार्ग असावा की ज्यावर पाण्याची फवारणी केली जाते आहे. एकीकडे पाण्यासाठी जनता वणवण करीत असताना, इथे मात्र दुरुस्तीचा कोणताही विचार न करता टँकरच्या टँकर मार्गावर ओतले जात आहे. खरंच, महामार्गाचे काम पूर्ण करायचं की, फक्त धुरळ्यावर पाण्याचा उतारा देत वेळ मारुन न्यायची आहे, असा प्रश्न जनता विचारत आहे.
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील कोलाड, खांब, सुकेळी, वाकणदरम्यान रस्त्याला पावसात पडलेले खड्डे व काही ठिकाणी नवीन कामासाठी चाललेली खोदाई त्यातून तयार होत असलेला धुरळा यामुळे मार्गावरून प्रवास करताना प्रवाशांची तारांबळ उडत आहे. मुंबई-गोवा महामार्गाचे काम गेली बारा-तेरा वर्षांपासूून सुरू असून, या कामात कोणतीही प्रगती नाही. परंतु, या मार्गाचे रखडलेले काम, त्यामुळे होत असलेला धुरळा याला पर्याय म्हणून या रस्त्यावर गेली अनेक वर्षे पाण्याची फवारणी करण्याचे काम सुरू आहे. काही ठिकाणी पिण्यासाठी पाणी नाही. मात्र, कोकणात त्याच पाण्याचे मोल काय? दररोज लाखो लीटर पाणी केवळ धुरळ्यावर वाया जात आहे, त्यामुळे हा जगातील पहिला राष्ट्रीय महामार्ग असावा की ज्यावर पाण्याची फवारणी केली जाते अथवा कोणताही विचार न करता टँकरच्या टँकर मार्गावर ओतले जात असून, पाण्याची नासाडी होत आहे. धुरळ्यावर पाणी फवारणी करून जणू टाईमपास सुरु असल्याचा आरोप जनतेतून होत आहे.
मुंबई-गोवा महामार्गावरील ब्रिटिश काळातील बनविलेले जुने रस्ते वर्षानुवर्षे चालले; परंतुु या महामार्गावरील चौपदरीकरणात बनविण्यात आणलेले काही रस्ते व काँक्रिटीकरण वाहतुकीसाठी लगेचच धोकादायक ठरत असून, प्रवाशांच्या जिवाशी जणू खेळ मांडला आहे, असा आरोप प्रवाशांकडून करण्यात येत आहे. दरम्यान, काही ठिकाणचे खड्डे अद्याप जैसे थे असताना नव्या कामाला ताबडतोब सुरूवात केली जाते. मात्र, दुरुस्तीकडे दुर्लक्ष केले जात आहे. त्यामुळे या धुळीला कितीही पाणी मारले तरी ही धूळ दहा मिनिटांत कोरडी पडत आहे. ही धूळ मुंबई-गोवा महामार्गावर असणाऱ्या व्यावसायिकांच्या दुकानात पसरून मोठे नुकसान होते. शिवाय, ही धूळ या महामार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या अंगावर उडत आहे. यामुळे ही धूळ नागरिकांच्या नाका-तोंडात जाऊन सर्दी, खोकला व श्वसनाच्या आजाराला सामोरे जावे लागत आहे. तर, ही धूळ डोळ्यात जाऊन अपघाताचा धोका निर्माण होत आहे.
मंत्र्यांची फक्त आश्वासने मुंबई-गोवा महामार्गावरील चौपदरीकरणाचे काम बारा-तेरा वर्षे उलटून गेली तरी अद्याप रखडलेले आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिक तसेच प्रवाशी अक्षरशः हैराण झाले आहेत. राज्यातील आणि केंद्रातील मंत्र्यांनी अनेकदा आश्वासने दिली; पाहणी दौरे केले, परंतु काम जैसे थेच. यामुळे सत्ताधाऱ्यांविरोधात कोकणातील चाकरमानी आणि पर्यटकांकडून संताप व्यक्त होत आहे.
पाणी फरवणी हा उपाय नाही चिखल, खड्डे, धूळ यापासून सुटका होण्यासाठी फक्त पाणी फवारणी करणे, हा पर्याय नाही. एकीकडे पाण्यावाचून जनता तडफडत असताना, पाण्यासाठी हाल होत असताना हजारो लीटर पाणी वाया घालवणे कितपत योग्य? पाण्याची झळ काय, हे येथील विदारक दृश्य पाहून कळते. मात्र, जलसिंचन विभागाचे याकडे लक्ष आहे की नाही, याबाबत साशंकता वाटते. महामार्गाच्या कामासाठी तसेच त्यावरील दुरुस्तीसाठी कोट्यवधी रुपये खर्च झाले त्याचे काही गणितच नाही. त्यामुळे माती आणि पाण्याचे मोल काय असेल, हेच कोडं सर्वसामान्य जनतेला आहे.