ताम्हणी घाटातील धबधबे, जैवविविधतेची भुरळ

| सुधागड-पाली | वार्ताहर |
माणगाव तालक्यातील पाटणूस, भिरा, विळे, रवाळजे व रायगड जिल्ह्याच्या वेशीवर असलेला पुणे जिल्ह्यातील ताम्हणी घाट येथील फेसाळते धबधबे, अप्रतिम निसर्ग सौंदर्य व जैवविविधता अनेकांना भुरळ घालत आहे. पावसाळ्यात तर येथील निसर्गसौंदर्य म्हणजे स्वर्गाची अनुभूती असते. म्हणूनच सध्या येथे असंख्य पर्यटक व निसर्गप्रेमींची अलोट गर्दी होत आहे. फक्त महाराष्ट्रातूनच नव्हे तर, भारतभरातून हा निसर्गाचा अमूल्य ठेवा पाहण्यासाठी व प्रत्यक्ष अनुभवण्यासाठी पर्यटक व अभ्यासक येतात.



या संपूर्ण परिसरात निसर्गाचा अमूल्य ठेवा दडला आहे. देवकुंड, खजिना ट्रॅक, व्हाईट वॉटर रिव्हर राफ्टिंग या उल्लैखनिय गोष्टिंसह गिधाड, बिबटे व राज्य प्राणी शेकरु या दुर्मिळ प्राण्याचे निवास्थानदेखील येथे आहे. हा दुर्मिळ, नैसर्गिक व ऐतिहासिक ठेवा असलेला परिसर जगाच्या पाठीवर आता सगळ्यांना समजू लागलेला आहे. परिणामी, येथे आता बाराहीमहिने पर्यटन वाढीस लागले आहे. त्यामुळे स्थानिकांना मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्या आहेत.


निसर्गाचा अमूल्य ठेवा
माणगाव तालुक्यातील पाटणुस, विळे, भिरा व रवाळजे आदी गावे सह्याद्रीच्या कुशीमध्ये वसले आहे. या गावाच्या अवतीभोवती सह्याद्रीच्या अजस्त्र पर्वत रांगा उभ्या आहेत. या सर्व गावांत व आसपासच्या परिसरात नैसर्गिक जैवविविधता प्रचंड प्रमाणात आहे. त्याच बरोबर सह्याद्रीच्या अंगा खांद्यावरून फेसळणारे पांढरे शुभ्र धबधबे सरळ खाली येऊन याच ठिकाणावरून पुढे नदी रुपात अरबी समुद्राकडे आगेकूच करतात.

पर्यटकांसाठी सोयीसुविधा
पातणुस व विळे-भागाड ग्रामपंचायतीच्या माध्यमातून या भागाचा पर्यटन विकासाला चालना देण्यासाठी विविध गोष्टी केल्या जात आहेत. पाटणूस, विळे व म्हसेवाडी येथे दोन चेकपोस्ट उभारण्यात आले आहेत. पर्यटकांना बसण्यासाठी पाटणुस परिसरात बाके बसविण्यात आली आहे. पर्यटकांकडून प्लास्टिक कचरा टाकू नये तसेच खबरदारीच्या सूचना देणारे दर्शनी फलक बसविले आहेत. स्थानिक गाईडना ओळखपत्र दिले आहेत. सुरक्षेच्या दृष्टीने पाटणूस परिसरात सीसीटीव्ही बसविण्यात आले आहेत. ग्रामस्थ व पर्यटकांसाठी शुद्ध फिल्टर पाण्याची व्यवस्था केली आहे. हॉटेल व व्यावसायिकांची नोंदणी केली आहे. परिसरात लॉज व हॉटेल व्यावसायिकांना व्यवसायाची योग्य संधी उपलब्ध करुन दिली आहे. माणगाव पोलिसांसोबत पर्यटन व पर्यटकांविषयी वेळोवेळी मिटिंग घेतल्या जातात.

Exit mobile version