माणगावची कलिंगडे सातासमुद्रापार

विक्रमी उत्पादनातून शेतकर्‍यांची लाखोंची उलाढाल; तालुक्यात दोन हजार एकरात लागवड

| माणगाव । सलीम शेख ।

शेती म्हणजे तोट्याचा धंदा, अशी ओळख निर्माण झाली आहे. माणगाव तालुक्यातील शेतकर्‍यांनी दोन हजार एकर क्षेत्रात पिकाची योग्य निवड, लागवड आणि जोडीला आधुनिक तंत्रज्ञानाचे मार्गदर्शन या जोरावर प्रत्येकी 15-20 टन कलिंगडाचे पीक घेतले आहे. वीस-वीस किलोचे एक कलिंगड अशा प्रकारे पीक तयार झाले आहे. या फळांना युरोपीय देशात मोठी मागणी असून, ही कलिंगडे सातासमुद्रापार विक्री करुन लाखो रुपयांची उलाढाल केली आहे.

तालुक्यात सुमारे 2 हजार एकर क्षेत्रावर शेतकर्‍यांनी विविध वाणाच्या कलिंगडाची लागवड केली आहे. हा शेतकरी नवनवीन होणारे तंत्रज्ञान व कृषी तज्ज्ञांचे मार्गदर्शन व सल्ला घेत उत्पादन घेत आहे. कमी पाण्यावर आता 100 टक्के शेतकरी ठिंबक व मल्चिंग पेपरचा वापर करून आधुनिक पद्धतीने कलिंगडाचे पीक घेत आहे. तालुक्यात शेतकरी सरासरी एकेरी 15 ते 20 टन उत्पन्न घेत आहेत. गेली दोन वर्षे नोन-यु-सीड्स प्रायव्हेट लि. या कंपनीच्या या जातीचे सफेद पट्टा असणारे हे फळ चवीला गोड असून माणगाव तालुक्यातील दहिवली, पाणोसे, गोरेगाव याठिकाणी पिकवले आहे. नोन-यु-सीड्स या कंपनीच्या सुप्रिम कलिंगडला पश्‍चिम महाराष्ट्रात गिरीश या नावाने ओळखले जाते. कोकणात सुप्रीम म्हणून ओळखले जाते. हे फळ लाल रंगाचे असून, चवीला गोड आहे. 55 दिवसांत हे फळ विक्रीसाठी तयार. माणगावातील शेतकर्‍याला एक फळ तब्बल 20 किलो वजनाचे भरले आहे. या फळाला युरोपियन देशात मोठ्या प्रमाणात मागणी आहे. मागील वर्षी दिपेश बाळाराम लाखाडे व महेंद्र शिंदे या शेतकर्‍यांनी दहिवली येथून शेतातून कंटेनर भरून थेट न्हावा-शेवा बंदरातून दुबई येथे पाठवले. त्याकरिता त्यांना चांगला भाव मिळाला होता.

चालू वर्षी सुप्रिम या 40 एकर क्षेत्रावर शेतकर्‍यांनी लागवड केली आहे. चालू वर्षी संदीप दसवते, रा. नाणोरे यांनी मोठ्या प्रमाणात पीक घेतले असून त्यांना चांगले उत्पन्न झाल्याचे त्यांनी कृषीवलशी बोलताना सांगितले. या कंपनीचे प्रतिनिधी धनाजी दळवी, ओंकार घाडगे, श्री. पाटील यांनी शेतकर्‍यांच्या शेतावर जाऊन कलिंगड लागवडीपासून काढणीपर्यंतचे सर्व तंत्रज्ञान शेतकर्‍यांना फायदा घेत असल्याचे पं.स. कृषी अधिकारी बाळकृष्ण काप यांनी सांगतिले. या कलिंगडाला मुंबई, पुणे येथील बाजापेठेबरोबरच युरोपातील विविध देशातून मागणी वाढली आहे. त्यामुळे माणगावची गोड असणारी कलिंगडे परदेशात गेली आहेत. नजीकच्या काळात माणगाव तालुका हा कलिंगडासाठी ओळखला जाणार आहे.

मार्गदर्शन आणि व्यवस्थापन महत्त्वाचे
गेली 10 वर्षे माणगाव तालुक्यात स्वदेश फाउंडेशन या संस्थेने शेतक-यांना ठिंबक मल्चिंग व पाईप लाईन देऊन मोठ्या प्रमाणात अनुदान व तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण दिले आहे. माणगाव तालुक्यात गेली 15 वर्ष शेतकरी गोल्डन, आयशा या जातींच्या कलिंगडाची लागवड मोठ्या प्रमाणात करीत आहे. मात्र, पांढरे पट्टे असणारे हे कलिंगड आता मोठ्या प्रमणात पिकवू लागला आहे. या कलिंगडाला युरोपीय देशातून मोठ्या मागणी आहे. श्री. दसवते या शेतकर्‍यांनी दहा हजार रोपे लावली होती. एकूण उत्पादनापैकी चाळीस टन माल प्रथम श्रेणीचा, तर आठ टन माल द्वितीय श्रेणीचा निघाल्याचे त्यांनी सांगितले.

Exit mobile version