। रत्नागिरी । प्रतिनिधी ।
दापोली-खेड-भरणे या मुख्य मार्गावर सतत वाहतूक सुरू असते. या रस्त्याची दुरुस्ती झालेली नसल्यामुळे दुरवस्था झालेली आहे. पावसाळा उलटून गेल्यानंतर या मार्गावर प्रचंड धुळीचा त्रास सहन करावा लागत आहे. या धुळीपासून तात्पुरता दिलासा देण्यासाठी प्रबोधनकार ठाकरे उद्यान ते मैत्री पार्कदरम्यान प्रशासनाकडून पाण्याचा फवारा मारण्यात आला. काही तासांसाठी धूळ खाली बसली असली, तरी दुपारनंतर वाहनांच्या वर्दळीबरोबर पुन्हा धुळीची तीव्रता वाढून श्वास घेणेदेखील कठीण झाले. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीतील या रस्त्यावरील खड्डे बुजवण्याचे काम काही दिवसांपूर्वीच सुरू झाले होते, मात्र ते अपूर्ण राहिल्याने अनेक खड्डे आचारसंहितेच्या कचाट्यात अडकून जैसे थेच राहिले आहेत. बारीक खडी टाकलेल्या ठिकाणी विशेषतः धूळ अधिक उडत असल्याची तक्रार नागरिकांनी केली. खड्डे परवडतील, पण धूळ नको, अशी परिस्थिती बनली असून, दुकानदार आणि स्थानिक नागरिकांकडून प्रखर नाराजी व्यक्त होत आहे. तात्पुरत्या उपायांपेक्षा कायमस्वरूपी दिलासा देण्यासाठी रस्त्याचे हॉट मिक्सिंगद्वारे डांबरीकरण तातडीने करावे, अशी मागणी होत आहे.







