। रसायनी । वार्ताहर ।
वावंढळ गाव तलाव पूर्णक्षमतेने भरून वाहू लागला आहे, त्यामुळे मार्च महिन्यापर्यंत पुरेल इतका पाणीसाठा निर्माण झाल्याने येथील गावांचा पाणीप्रश्न कायमचा मिटला आहे. त्यामुळे नागरिकांमधून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.
खालापूर तालुक्यातील ग्रामपंचायत वावंढळ येथील शिवकालीन तलाव भरून वाहू लागला आहे, त्यामुळे तूर्तास मार्च महिन्यापर्यंत पाणीटंचाई भासणार नाही, असे चित्र दिसू लागले आहे. ग्रामपंचायतीची पाणीपुरवठा योजना या तलावावर अवलंबून आहे. या तलावाचे पाणी नियोजपूर्वक वापरल्यास मार्चपर्यंत पाणी पुरते. या तलावाचे सरोवर संवर्धन योजनेंतर्गत काम सन 2019 साली मंजूर झाले आहे. मात्र गेली तीन वर्षे हे काम रखडले असून, ग्रामपंचायतीने आपला वाटा म्हणून दहा टक्के रक्कम भरायची आहे.
साधारण ही रक्कम चोवीस लाखांच्या घरात आहे. परंतु, ग्रामपंचायत आर्थिक समृद्धीत नसल्याने ही रक्कम शासनाने भरावी यासाठी माजी सरपंच अर्जुन कदम यांनी तत्कालीन पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांच्या दालनात भेट घेऊन पत्र दिले आहे.