माणगाव, श्रीवर्धन, महाड व पोलादपूरच्या एसटी बसेसना नागोठणे स्थानकाचे वावडे

प्रवाशांतून तीव्र संताप

| नागोठणे | प्रतिनिधी |

रायगड जिल्ह्यातील महत्त्वाचे व मध्यवर्ती स्थानक असलेल्या राज्य परिवहन महामंडळाच्या नागोठणे एसटी बसस्थानकात माणगाव, महाड, श्रीवर्धन व पोलादपूर आगाराच्या काही एसटी बसेस येत नाहीत. या बसेसची नोंद नागोठणे स्थानकात कारणे बंधनकारक असतानाही या बसेस परस्पर शहराबाहेरील महामार्गावरूनच जात आहेत. त्यामुळे या बसेसना नागोठणे स्थानकाचे वावडे का, असा प्रश्न उपस्थित करून प्रवाशांतून तीव्र संताप व्यक्त होत आहे.

मध्यवर्ती स्थानक असल्याने नागोठणे स्थानकातून सकाळी साडेपाच वाजल्यापासून सुरु होणारी एसटी बसेसची वाहतूक रात्री दहा वाजेपर्यंत सुरु असते. दरम्यान, दिवसभरात विविध ठिकाणी जाणाऱ्या सुमारे दोनशे बसेस या स्थानकातून ये-जा करीत असतात. त्यामुळे दोन पाळ्यांमध्ये या स्थानकाचा कारभार दोन वाहतूक नियंत्रक चालवीत आहेत. माणगाव, महाड, श्रीवर्धन व पोलादपूर आगाराच्या मुंबईकडे ये-जा करणाऱ्या गाड्या या स्थानकात नोंद करून पुढे जाणे बंधनकारक आहे. असे असूनही केवळ काही ठराविक गाड्याच येथे नोंद करीत आहेत. इतर सर्व गाड्या नागोठण्यात येणाऱ्या प्रवाशांना महामार्गावरच उतरत आहेत. तसेच नागोठणे स्थानकातील प्रवाशांना स्थानकात बस न मिळाल्यास बससाठी प्रवाशांना महामार्गावर जावे लागत आहे. त्यामुळे त्या प्रवाशांना चालत अथवा रिक्षाचा आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे.

त्याचप्रमाणे नागोठणे स्थानकातील उपहारगृह गेली काही वर्षे बंद आहे. या कारणास्तव काही वाहनचालक गाड्या बाहेरून नेत असल्याचे प्रवाशी सांगत आहेत. अशाप्रकारे काही वाहनचालकांचा आडमुठेपणा आजही सुरूच आहे. त्यामुळे या गाड्या चालकांची खासगी मालमत्ता आहे का, असा प्रश्नही प्रवाशांतून उपस्थित होत आहे. तसेच या बाहेरून जाणाऱ्या गाड्यांसंदर्भात नागोठणे वाहतूक नियंत्रकांनी रामवाडी-पेण येथील विभागीय वाहतूक नियंत्रकांकडे अनेकवेळा लेखी पत्रव्यवहार करूनही काहीही उपयोग झालेला नाही. त्यामुळे आता एसटीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनीच आता याप्रकरणी लक्ष घालावे, अशी मागणी जोर धरत आहे.

रायगड विभागातील शिवशाही वगळता इतर सर्व एसटी बसेस नागोठणे स्थानकात येणे बंधनकारक आहे. तरीही नागोठणे स्थानकात न येणाऱ्या एसटी बसेससंदर्भात त्यांच्या आगारप्रमुखांना सूचना करण्यात येतील. त्याचे पालन न करणाऱ्या वाहनचालकांवर कारवाई करण्यात येईल.

दीपक घोडे, विभागीय वाहतूक नियंत्रक, रामवाडी-पेण
Exit mobile version