| दिघी | वार्ताहर |
कोकण किनारपट्टीवर जोरदार वाऱ्यासह पाऊस पडण्यासह समुद्राला उधाण येऊन उंच लाटा उसळणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे. मात्र, श्रीवर्धन तालुक्यात पावसाने हजेरी लावली नसली तरी किनाऱ्यांवर समुद्राच्या उंच लाटा उसळत आहेत. उधाणाच्या भरतीचा तडाखा किनारपट्टीला बसला आहे.
किनारपट्टीसह सर्वत्रच गुरुवारी समुद्राला उधाण आले. दिवसभर पावसाचा ठाण पत्ता नव्हता, तरी हवामान विभागाने दिलेल्या इशाऱ्यानुसार किनारपट्टी भागात उधाणाच्या लाटांचा जोर वाढलेला होता. अजस्त्र लाटा किनारी भागात आदळत होत्या. समुद्र खवळलेला असल्यामुळे किनारी भागात उंच लाटा उसळत होत्या. तालुक्यातील श्रीवर्धन, हरिहरेश्वर, दिघी, भरडखोल आदी भागांत उधाणाचे पाणी किनारा सोडून बाहेर येत होते. त्यातून जोरदार लाटांचा प्रहार किनारी भागाला होत होता. भरडखोल परिसरात तर किनाऱ्यावरील लाटा घरांवर आपटत होत्या. समुद्रात पाण्याच्या पातळीत वाढ झाल्याने भरडखोल गावातील काहि घरामध्ये पाणी शिरले होते. मात्र, कोणतीही जीवितहानि झाली नसल्याचे समजले.







