। पनवेल । वार्ताहर ।
आम्ही उलवेकर मित्र मंडळ यांच्यावतीने दिला जाणारा त्रिवार्षिक उलवेरत्न पुरस्कार शनिवारी (दि.22) संस्थेचे संस्थापक अध्यक्ष सचिन राजे-येरुणकर यांच्या नेतृत्वाखाली उलवेतील सेक्टर 17 येथील मैदानावर पार पडला. हा पुरसस्कार शेकापचे खजिनदार तथा पनवेल मनपाचे माजी विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे, काँग्रेसचे रायगड जिल्हाध्यक्ष महेंद्र घरत व गव्हाण सरपंच माई भोईर यांच्या प्रमुख उपस्थितीत देण्यात आला. यावेळी समाजात उल्लेखनीय कार्य करणार्या शेलघर येथील यमुना सामाजिक शैक्षणिक संस्थेच्या 17 रत्नांचा गौरव करण्यात आला.
तीन वर्षातून एकदा आयोजन करण्यात येत असलेल्या या उलवेरत्न पुरस्कार सोहळ्याचे हे दुसरे पर्व मोठ्या दिमाखदार पद्धतीने पार पडले. आम्ही उलवेकर मित्र मंडळाच्यावतीने समजपयोगी कार्यक्रमांसह सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन देखील यावेळी करण्यात आले होते. या पुरस्कार सोहळ्यामध्ये एकूण 17 रत्नांचा शोध घेऊन त्यांना गौरविण्यात आले. यामध्ये कवी आणि घोषवाक्य डिझायनर कुणाल वारुळे, लेखिका मनीषा पोखरकर, व्यसनमुक्ती केंद्राच्या संचालिका मनीषा वाळकुंडे, कराटेत प्राविण्य मिळावीणारा ओमकार अय्यर, युट्युबर स्वप्निल गाडगे, उद्योजिका अंकिता गोंधळी, गिनीज आणि इंडियन वर्ल्ड रेकॉर्ड होल्डर साईशा राऊत व सिद्धार्थ दास, अभिनेता महेंद्र तांडेल, गायक यज्ञिक मोकळ, समाजसेविका निकिता खारकर, समाजसेवक वितेश म्हात्रे, बेसबॉलपट्टू तनवी इंगळे, अॅथलेटिकमध्ये सुवर्ण कामगिरी करणारा रचित पाटील, क्रिकेटमध्ये रायगड जिल्ह्यात अव्वल राहणारा संघ जीवदानी स्पोर्ट्स क्लब बामण डोंगरी यांच्यासह अनेक सेवाभावी संस्थांना व गोरगरिबांना सर्वतोपरी मदत करणारी यमुना सामाजिक शैक्षणिक संस्था शेलघर यांचा उलवेरत्न पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला.