‘आम्ही वढावकर’चा निराधाराला आधार

85 हजारांची केली आर्थिक मदत

| हमरापूर | वार्ताहर |

एकजूट काय असते ती पेण तालुक्यातील वढाव गावातील तरुणांनी दाखवत आम्ही वढावकर ग्रुपच्या माध्यमातून निराधार कुटुंबाला आर्थिक मदत करत समाजापुढे एक आदर्श निर्माण केला आहे.

आईवडिलांचे छत्र हरपले की त्यांच्या लहान मुलांना कोणत्या परिस्थितीला सामोरे जावे लागते ते आपण पाहत आलो आहोत. रुपेश सदाशिव पाटील यांचे वयाच्या 34 व्या वर्षी आजारपणाने निधन झाले. त्याची पत्नी काही वर्षांपूर्वी घर व मुलांना सोडून माहेरी निघून गेली. निधनानंतर त्याची दोन लहान मुले, मुलगा 8 वर्षे, तर मुलगी 12 वर्षांची आईबाबा विना पोरकी झाली. मुलांसोबत वयस्कर आजी आहे. ती पण नेहमी आजारी असते. त्या लहान मुलांची जबाबदारी आजीवरच येऊन पडली. कमाईचे साधन नाही, घरात कमवता कोणीही नाही, मुलांचे शिक्षण या सर्व आर्थिक बाबीत हे कुटुंब सापडले असताना संकटात धावून जाणारा आम्ही वढावकर म्हणून वढाव गावातील तरुण ठामपणे कुटुंबासोबत उभा राहिले. रुपेशच्या मृत्यूनंतर वढाव गावातील तरुण एकत्र येत आम्ही वढावकर व्हाट्सअ‍ॅप ग्रुपच्या माध्यमातून रुपेशच्या कुटुंबासाठी मदतीचे आवाहन करण्यात आले. चार-पाच दिवसांत 85 हजार 450 रु. एवढी रक्कम जमा झाली.

याआधीही आम्ही वढावकर ग्रुपने शैक्षणिक, सामाजिक, गावातील विकास ग्रुपच्या माध्यमातून स्वखर्चाने केले आहे. हे शक्य झाले आम्ही वढावकर ग्रुप तरुणाच्या एकजुटीने. होळी हा कोकणातील आनंदाचा सण. त्या दिवशी आम्ही वढावकर ग्रुपचे काही सदस्य सदर कुटुंबाच्या घरी जाऊन ही रक्कम मुलांच्या आजीजवळ दिली. या समाजोपयोगी कामामुळे आम्ही वढावकर व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपचे वाशी खारेपाट भागासह तालुक्यात सर्वत्र कौतुक होत आहे.

Exit mobile version