वातावरणीय बदलामुळे वालाच्या शेंगांचे उत्पादन लांबणीवर
| पाली/गोमाशी | वार्ताहर |
अवकाळी पावसाने प्रथमतः खरीप हंगामातील भातशेतीतून तोंडाशी आलेला घास शेतकऱ्यांकडून हिरावून घेतला. त्यानंतर रब्बी हंगामात भाजीपाला लागवड आणि कडधान्याची नासाडी केली आहे. त्यातच आता ऐन गुलाबी थंडीत वातावरणीय बदलाचा फटका तूर, वालाच्या शेंगा उत्पादक शेतकऱ्यांना ही बसल्याचे चित्र रायगड जिल्ह्यातून समोर येत आहे.
कारण आतापर्यंत वालाच्या शेंगाचे उत्पादनच झालेले नाही. त्यामुळे शेंगा प्रेमींना ग्रामीण भागातील गावठी शेंगांसाठी वाट पहावी लागणार आहे. तत्पूर्वी वालाच्या शेंगांची आवक मार्गशीर्ष महिन्यापासून चांगल्या प्रमाणात होत होती. मात्र, मागील एक दोन वर्षांपासून अवकाळी पाऊस अधून मधून हजेरी लावत असल्याने वालाच्या शेंगांचे उत्पादन लांबणीवर जात असल्याचे पाहायला मिळत आहे. दरम्यान सद्यस्थितीत रायगड मधील भाजीपाला बाजारातील उपलब्ध असलेल्या वालाच्या शेंगा ह्या अधिकतम बाहेरील जिल्ह्यातून येत असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले. त्यामुळे ऐन थंडीत शेंगा प्रेमीच्या जिभेला हव्या असणाऱ्या ग्रामीणमधील गावठी शेंगांच्या पोपटीच्या माध्यमातून चवीचा आस्वाद घेता येत नसून गावठी शेंगांची पारख असलेले ग्राहकांची हिरमोड होत असून, असे ग्राहक बाजारात येणाऱ्या शेंगा खरेदी करण्यास कानाडोळा करत असून गावठी शेंगांच्या प्रतिक्षेत असल्याचे दिसून येत आहे.
भात कापणीनंतर लागवड केलेल्या वालाच्या शेंगांचे उत्पादन जानेवारी, फेब्रुवारीपर्यंत मोठ्या प्रमाणात होत होते. परंतु, मागील काही वर्षांपासूनच्या अवकाळीने भातशेतीसह भाजीपाला, कडधान्य या अक्षरशः चुराडा केला असतानाच आत्ता भातशेतीतील लावणी आणि कापणीचा कालावधी लांबल्याने कडधान्ये, वालाच्या शेंगांची लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांचे ही गणित कोलमडले असून शेंगांच्या उत्पादनाची प्रतीक्षा करावी लागत असाल्याने शेतकऱ्यांना नुकसान सहन कराव लागत आहे. अलीकडील बदलत्या हवामान स्थितीचा पिकांवर परिणाम होत असून, महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यात चालू हंगामात पावसाचा कालावधी अपेक्षेपेक्षा मोठ्या प्रमाणात लांबल्यामुळे जमिनीत जास्त काळ ओलावा टिकून राहिला. खरीप पिकांपैकी भात कापणीस विलंब झाला, याचा थेट परिणाम म्हणून रब्बी हंगामातील कडधान्य पिकांच्या पेरणीस उशीर झाला. विशेष म्हणजे खरीपातील वाल व कडधान्ये पिकांवरती या हवामान बदलाचा परिणाम झाला आहे. दीर्घकाळ ओलावा व सूर्यप्रकाशाचा अभाव यामुळे या पिकांत फुलोरा येण्यास विलंब झाला असून पिकांची वाढ मंदावलेली दिसून येत आहे.







