| पनवेल | प्रतिनिधी |
पनवेल हे मुंबईचे प्रवेशद्वार आहे, गेली 55 वर्षे शेतकरी कामगार पक्षाचे वर्चस्व या भागात आहे, शेतकरी कामगार पक्षाने नेहमीच लढाऊ आणि अभ्यासू आमदार विधानसभेत पाठवले. पूर्वी रायगडचा आमदार कोण हे शेकाप ठरवत असे; परंतु आता रायगड जिल्ह्याचे दोन भाग पडून अर्धा मावळमध्ये आणि अर्धा रायगडमध्ये गेलेला आहे. पूर्वी आम्ही काँग्रेसच्या विरोधात काम करत होतो आणि आता संविधान वाचविण्यासाठी महाविकास आघाडीसोबत आहोत, असे प्रतिपादन शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस आमदार जयंत पाटील यांनी केले.
तळोजा फेज-2 येथे शेतकरी कामगार पक्षाच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन आणि दिक्षा दिलीप जाधव यांच्यासह त्यांच्या सहकाऱ्यांच्या पक्ष प्रवेश शनिवार, (दि. 16) मार्च रोजी झाला. यावेळी बोलत होते. ते पुढे म्हणाले, पुन्हा मोदी सरकार आले तर भारतीय घटनेत बदल केले जातील, ते थांबवण्यासाठी आपल्याला काम करायचे आहे. रायगड जिल्ह्यातील संपूर्ण सहकार क्षेत्र हे शेतकऱ्यांच्या हातात आहे. आमच्याकडे सध्या 2000 सहकारी संस्था आहेत. शिवसेनेचे जिल्हा रायगड जिल्हा संपर्कप्रमुख बबनदादा पाटील ही लढवय्ये कार्यकर्ते आहेत, त्यांचे वडील शेकापचे कट्टर कार्यकर्ते होते. आ. रोहित पवार हे प्रथम व्यवसायात आहेत, नंतर राजकारणात आले. आणि, आता ते सोबत गेले नाहीत म्हणून त्यांना त्रास दिला जातोय. जे अजित पवार उतार वयात आपल्या काकांना त्रास देत आहेत, ते जनतेची कामे काय करणार, असा टोला त्यांनी लगावला. जर पुन्हा भाजपा सत्तेत आली, तर गरिबांच्या मुलांना शिक्षण, रोजगार कमी होतील आणि या देशात गरिबी वाढतच जाईल, अशी भीती आ. पाटील यांनी व्यक्त केली.
यावेळी व्यासपीठावर माजी आ. बाळाराम पाटील, शिवसेनेचे बबनदादा पाटील, पनवेलचे माजी नगराध्यक्ष जे.एम. म्हात्रे, पनवेल विधानसभा अध्यक्ष काशिनाथ पाटील, काँग्रेसचे सुदाम पाटील, पनवेल कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती नारायण घरत, डॉ. दत्तात्रय पाटील, काँग्रेसच्या श्रुती म्हात्रे, माजी नगरसेवक ज्ञानेश्वर पाटील, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सदस्य देवा मढवी, पनवेल महानगरपालिकेचे नगरसेवक शेतकरी कामगार पक्षाचे पदाधिकारी आणि नागरिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
यावेळी आपले मनोगत व्यक्त करताना बाळाराम पाटील यांनी सांगितले की, दहा वर्षांपूर्वी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले होते की, ‘न खाऊंगा, न खाने दूंगा’ आणि आता ‘बहुत खाया है, इलेक्शन आया है तो थोडासा देंगे’ अशी वाटचाल सुरू आहे. त्यांनी पुढे सांगितले, तळोजा फेज-2 हा परिसर झपाट्याने वाढत आहे. या ठिकाणी नागरिक हे मुंबईतून आलेले आहेत, त्यांच्या सर्व नागरी समस्या यामध्ये पाण्याचा प्रश्न, मालमत्ता कराचा प्रश्न, तसेच दळणवळणाची साधने या गोष्टीवर आम्ही शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने मार्ग काढू.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रकाश म्हात्रे यांनी केले. आपल्या प्रास्ताविकात त्यांनी शेतकरी कामगार पक्षाचा इतिहास सांगितला. यावेळी दिक्षा दिलीप जाधव यांना तळोजा फेज-2 अध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली. प्रसाद ढगे पाटील यांची प्रभाग तीनचे निरीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
माझ्यावर शेकापने जी जबाबदारी दिली, त्याच्या माध्यमातून शेकापची वाढ करीत असताना गरीब महिलांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी बचत गटांची स्थापना करणार, या ठिकाणी भेडसावणारा पाणीप्रश्न आणि दळणवळणाची साधने कशी वाढवता येतील याकडे लक्ष देणार.
दीक्षा दिलीप जाधव