आम्हाला प्रकल्प नको!

जैववैद्यकीय प्रकल्पाविरोधात रसायनीकर आक्रमक

| पाताळगंगा | वार्ताहर |

बोरीवली या परिसरात येत असलेला एसएमएस इन्व्होक्लीन प्रा.लि. हा जैववैद्यकीय प्रकल्प (बायोमेडिकल वेस्ट) स्थानिकांनी कडाडून विरोध दर्शविला आहे. यासाठी गावोगावी जनजागृती मोहीम राबविण्यात आली असून, या परिसरातील गु्रप ग्रामपंचायतींनी हा प्रकल्प या ठिकाणी नको यासाठी पाठिंबा दर्शविला असून, एक पत्रसुद्धा देण्यात आले आहे. हा प्रकल्प मानवी आरोग्यास तसेच मुक्या प्राण्यांस घातक असून कॅन्सर, टीबी, अस्थमा, न्युमोनिया, त्वचारोग आदी आजारांचा धोका होण्याचा संभव आहे.

हा प्रकल्प गोवंडी येथे असून, येथील स्थानिकांना त्याचा त्रास होत असल्यामुळे उच्च न्यायालयाने हा प्रकल्प स्थलांतर करण्याचे आदेश दिले आहेत. हा प्रकल्प आत्करगाव येथे येत असल्याचे समजताच येथील जनसुनावणीदरम्यान विरोध दर्शविल्याने आता तो प्रकल्प बोरीवली येत असल्यामुळे येथील ग्रामस्थांनी विरोध दर्शविला असून, 4 मार्च रोजी मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. काही झाले तरी या ठिकाणी हा कारखाना नको, अशी भूमिका या परिसरातील ग्रामस्थांनी घेतली आहे.

हा प्रकल्प रद्द करण्यासाठी विविध ठिकाणी निवेदन देण्यात आले. या (बायोमेडिकल वेस्ट) प्रकल्पामध्ये मोठ्या रुग्णालयातील वैद्यकीय कचरा, मानवी अवयव, प्राण्यांचे अवयव, रक्त, वापरलेल्या सुया, मलमपट्टी आदी सर्व या ठिकाणी येणार आहे. त्यालगतच पाताळगंगा नदी असून, हेच पाणी जर नदीमध्ये गेले, तर विविध आजार निर्माण होण्याची दाट भीती व्यक्त केली जात आहे. त्याचबरोबर याच पाण्यावर प्रक्रिया करुन दैनंदिन जीवनात वापरले जात आहे. येणाऱ्या पिढीला वाचविण्यासाठी या प्रकल्पास विरोध हा एकमेव लढा असल्याचे येथील नागरिकांचे म्हणणे आहे.

Exit mobile version