आमचं ठरलं… अक्षया नाईक नगराध्यक्षपदाच्या उमेदवार

महाविकास आघाडीमध्ये युवा नेतृत्वाला संधी

| रायगड | जिल्हा प्रतिनिधी |

अलिबाग नगरपरिषदेच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. शेकापसह महाविकास आघाडी ही निवडणूक एकत्र लढविणार आहेत. त्यानिमित्ताने रविवारी शेकाप भवनमध्ये बैठक झाली. या बैठकीत महाविकास आघाडीकडून नगराध्यक्षपदासाठी शेकापच्या अक्षया नाईक, वॉर्ड क्रमांक पाचमध्ये नगरसेवकपदासाठी काँग्रेसचे समीर ठाकूर, वॉर्ड क्रमांक सातमध्ये नगरसेवकपदासाठी अभय म्हामूणकर यांची उमेदवारी शेकाप सरचिटणीस जयंत पाटील यांनी जाहीर केली.

यावेळी अलिबाग नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष प्रशांत नाईक, शेकाप प्रवक्त्या चित्रलेखा पाटील, रायगड बाजारचे चेअरमन नृपाल पाटील, शेकाप राज्य महिला आघाडी प्रमुख ॲड. मानसी म्हात्रे, शेकाप जिल्हा सहचिटणीस ॲड. गौतम पाटील, शेकाप राज्य कामगार आघाडी प्रमुख प्रदीप नाईक, काँग्रेसचे जिल्हा वरिष्ठ उपाध्यक्ष राजा ठाकूर, योगेश मगर, प्रभाकर राणे, ॲड. उमेश ठाकूर, शेकाप तालुका चिटणीस सुरेश घरत, जगदीश कवळे, विजय भगत, पांडुरंग भगत, सुकुमार भगत, ॲड. सचिन जोशी, संजना कीर, अश्विनी पाटील, महेश शिंदे, राकेश चौलकर आदी मान्यवरांसह शेकापसह काँग्रेस, महाविकास आघाडीचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

अक्षया नाईक यांची नगराध्यक्षपदासाठी, तर नगरसेवकपदासाठी समीर ठाकूर, अभय म्हामुणकर यांची उमेदवारी जाहीर करताच कार्यकर्त्यांची जल्लोष केला. विशेष म्हणजे, अलिबागचे माजी नगराध्यक्ष प्रशांत नाईक यांची कन्या अक्षया नाईक यांचे सामाजिक क्षेत्रात योगदान राहिले आहे. त्यांची नगराध्यक्षपदासाठी उमेदवारी जाहीर होताच, कार्यकर्त्यांकडून टाळ्यांच्या कडकडाटासह फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. महाविकास आघाडीचा विजय असो अशा घोषणांनी सभागृह दणाणून सोडला. यावेळी अक्षया नाईक यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचे अभिनंदन करण्यात आले. त्याचप्रमाणे पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या. उपस्थितांकडून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करण्यात आला. अलिबाग नगरपरिषदेत 20 नगरसेवकांच्या जागांसाठी निवडणूक होणार आहे.

वॉर्ड क्रमांक पाचमधील नगरसेवकपदाच्या उमेदवारीसाठी काँग्रेसचे समीर ठाकूर, वॉर्ड क्रमांक सातमधील नगरसेवकपदाच्या उमेदवारीसाठी अभय म्हामुणकर यांच्या नावांची घोषणा करण्यात आली. त्यांचेदेखील पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले. तसेच त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.

Exit mobile version