निवडणुका डोळ्यासमोर ठेवून पक्षाचा वर्धापन दिन यशस्वी करायचाय: सुरेश खैरे

| माणगाव | सलीम शेख |

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका डोळ्यासमोर ठेवून आपल्याला पक्षाचा वर्धापन दिन यशस्वी करायचा असून, यासाठी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी दि.2 ऑगस्ट रोजी दुपारी नवीन पनवेल येथे पोलीस मैदानावर होणाऱ्या वर्धापन दिन कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित राहा, असे आवाहन शेतकरी कामगार पक्षाचे जिल्हा चिटणीस सुरेश खैरे यांनी माणगाव येथे कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना केले.

शेतकरी कामगार पक्षाचा वर्धापन दिन कार्यक्रम दरवर्षी दि.2 ऑगस्ट रोजी मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. यावर्षी नवीन पनवेल येथील पोलीस मैदानावर पक्षाचा 2 ऑगस्ट रोजी वर्धापन दिन साजरा करण्यात येणार आहे. या संदर्भात माहिती देण्याकरिता तसेच पक्ष संघटना अधिकतम बळकट करण्यासाठी पक्षाचे जिल्हा चिटणीस सुरेश खैरे यांच्या प्रमुख उपस्थितीत माणगाव – तळा तालुक्यातील पक्षाच्या प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक रविवार दि.27 जुलै 2025 रोजी कृषी उत्पन्न बाजार समिती माणगाव येथील सभागृहात आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी उपस्थित कार्यकर्त्यांना जिल्हा चिटणीस सुरेश खैरे यांनी बहुमोल असे मार्गदर्शन केले.

या बैठकीला पक्षाचे सहचिटणीस ॲड. गौतम पाटील, ज्येष्ठ नेते प्रदीप नाईक, राजिपचे माजी समाज कल्याण सभापती अशोक गायकवाड, राजिपचे माजी कृषी सभापती तथा माणगाव तालुका चिटणीस अस्लम राऊत, तालुका सहचिटणीस राजेश कासारे, जिल्हा चिटणीस मंडळाचे सदस्य नामदेव शिंदे, दिनेश गुगळे, चंद्रकांत सत्वे, युवा नेते नितीन वाघमारे, ॲड. विलास गोठल, ॲड.कौस्तुभ धामणकर, ॲड. मुसद्दीक राऊत, ज्येष्ठ नेते सखाराम जाधव, दिलीप उतेकर, हसनमिया बंदरकर, बाळकृष्ण अंबुर्ले, माजी उपसरपंच अमोल मोहिते, निजाम फोपळूणकर आदींसह पक्षाचे ज्येष्ठ व तरुण कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी मार्गदर्शन करताना सुरेश खैरे पुढे म्हणाले की, जिल्ह्यात पक्षबांधणीसाठी प्रत्येक तालुक्यात आपण आपले नेते जयंत पाटील यांनी संवाद बैठका आयोजित केल्या होत्या. या संवाद बैठकींना प्रत्येक तालुक्यातून कार्यकर्त्यांचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद लाभला. या संवाद बैठकीतून पक्षाचा निष्ठावंत कार्यकर्ता हा पक्षासोबत असल्याचे दिसून आले. त्यानंतर पेझारीला पक्ष संघटना बळकट करण्याच्या दृष्टीकोनातून आपण विविध पदांवर कार्यकर्त्यांचं नियुक्त्या केल्या. त्यानंतर प्रत्येक तालुक्यातील पक्षाच्या नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र पाठविण्यात आले. माणगाव तालुक्याचा पक्षाच्या दृष्टीने विचार केला तर पक्षाचे नेतेमंडळी इकडे तिकडे गेले; परंतु पक्षाचा निष्ठावंत कार्यकर्ता हा पक्षासोबतच राहिला. येणाऱ्या काळात आपल्याला प्रयेक तालुक्यातील गाव, वाडी, वस्त्यांमध्ये काम करायचे आहे.

जनतेची छोटीमोठी कामे केल्यास निश्चितच जनता आपल्या बरोबर राहील. पुढे काही महिन्यांवर ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद अशा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका येऊन ठेपल्या आहेत. या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून पक्षाच्या कार्यकर्त्यांनी संघटना मजबूत करण्याच्या दृष्टीकोनातून काम करून नवीन पनवेल येथे होणाऱ्या पक्षाच्या वर्धापन कार्यक्रमाच्या निमित्ताने महामार्गाच्या चौकात आपल्या नेतेमंडळींचे फोटो, पक्षाचे झेंडे लावून जिल्ह्यात सर्वत्र वातावरण निर्मिती करा. असे सांगत पक्षाचे माणगाव तालुक्यातील मोर्बा येथील ज्येष्ठ नेते तथा तालुका चिटणीस अस्लम राऊत यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन तालुका सहचिटणीस राजेश कासारे यांनी करून बैठकीची उत्साहात सांगता करण्यात आली.

Exit mobile version