शरद पवार यांचा अजित पवार गटाला इशारा
| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |
माझ्या अध्यक्षपदाच्या निवडीवर तुम्हा 70 लोकांच्या सह्या आहेत. त्यामुळे राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्हाचा वापर करण्याचा अधिकार फक्त आम्हालाच आहे, असा इशारा राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांनी अजित पवार गटाला दिला. दिल्लीतल्या कॉन्स्टिट्यूशन क्लबमध्ये पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत गुरुवारी ते बोलत होते.
लोकांना तपास यंत्रणा माहीत नव्हत्या, पण आता विरोधकांची तोंड बंद करण्यासाठी केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर होत असल्याकडे त्यांनी लक्ष वेधले. पूर्वीचे पंतप्रधान आणि आताचे पंतप्रधान यांच्यात खूप फरक आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष भ्रष्ट असल्याचे त्यांनी म्हटले होते. आम्ही त्यांना पुरावे मागितले. चौकशी करण्याचीदेखील मागणी केली होती. मात्र ज्यांच्याविरोधात आरोप केले त्यांनाच यांनी राज्याच्या मंत्रिमंडळात स्थान दिले. त्यामुळे भाजपाने आता त्यांच्या पक्षाचे कमळ हे चिन्ह बदलावे आणि वॉशिंग मशिन घ्यावे, असा टोला त्यांनी लगावला.