आमचा विकास आम्हीच करणार

मतदानावर टाकणार बहिष्कार; नऊ गाव ग्रामस्थांचा एल्गार .. हेडींग…

| पाली/वाघोशी | प्रतिनिधी |

वर्षानुवर्षे रखडलेला रस्ता, गावांमध्ये विकास कामाची बोंबाबोंब, कर भरूनही विकासाच्या नावाने ठेंगा, लोकप्रतिनिधींचे मतदानानंतर तोंडाला पान पुसण्याचे काम या सर्व गोष्टींना कंटाळून सुधागड तालुक्यातील नऊ गावांनी एकत्र येऊन आपला विकास आपणच करण्याचा निश्चय केला आहे. याचे पहिले पाऊल म्हणजे, रविवारी (दि.7) ग्रामस्थांनी स्वखर्चाने पाच्छापूर फाटा ते पाच्छापूर गाव हा सहा किलोमीटरचा रस्ता बनवण्यास सुरुवात केली आहे.

पाच्छापूर, रामवाडी, असानेवाडी, झेंडेवाडी, पंचशील नगर, दर्यागाव, गौळमाळ, गौळमाळ ठाकूरवाडी व सोनारवाडी या नऊ गावांतील ग्रामस्थांनी वर्षापासूनच्या समस्यांना आता स्वतः सोडवण्यासाठी पुढाकार घेतला आहे. त्यासाठी त्यांनी नऊ गाव संघर्ष समितीची स्थापनासुद्धा केली आहे. आगामी कोणत्याही निवडणुकांमध्ये मतदान न करण्याचा निर्णयदेखील येथील ग्रामस्थांनी घेतला आहे.

मागील अनेक वर्षांपासून पाच्छापूर ते पाच्छापूर फाटा या सहा किलोमीटर रस्त्याची प्रचंड दुरवस्था झाली आहे. स्थानिक लोकप्रतिनिधी व आमदार यांनी वारंवार रस्ता दुरुस्त करण्याची आश्वासने दिली, मात्र आजतागायत हा रस्ता काही झाला नाही. रस्ता खराब असल्यामुळे वारंवार अपघातदेखील झाले. शाळकरी मुले, रुग्ण, व्यावसायिक, दूधवाले यांना या खडतर मार्गावरून प्रवास करावा लागतो. त्यामुळे अखेर ग्रामस्थांनी एकत्र येऊन लोकवर्गणी गोळा केली स्वतः श्रमदान केले आणि या रस्त्याच्या कामाला सुरुवात केली. यासाठी जितेंद्र गद्रे, उमेश तांबट, रोशन बेलोसे, बाळू दिघे, प्रल्हाद ओंबळे, प्रवीण ओंबळे, रविंद्र हळदे, भगवान दिघे, महेश वारंगे, कमलाकर शिदोरे, चंद्रकांत मालोरे व नाथा चोंडे आदींसह असंख्य ग्रामस्थ एकत्र आले होते.

स्वखर्चाने विकासकामे
दुर्गम भागामध्ये असल्याने या गावांमध्ये मोबाईल नेटवर्क नाही. परिणामी, लोकांना संपर्क साधणे अवघड जात होते. त्यामुळे गावकऱ्यांनी लोकवर्गणी काढून स्वतःच्या घरांमध्ये वायफाय बसवले आहेत. याशिवाय स्वदेस फाऊंडेशनच्या माध्यमातून तसेच लोकवर्गणी काढून गावात पथदिवे बसवले आहेत.
कर न देता स्वतःच विकासकामे करणार
शासनाकडे कुठल्याही प्रकारचा कर जसे घरपट्टी, पाणीपट्टी आदी न जमा करता त्याच पैशातून स्वतःच गावाचा सर्वांगीण विकास करण्याचा निर्धार गावकऱ्यांनी केला आहे. कारण शासनाकडे कर भरूनदेखील मूलभूत गरजाच पूर्ण होत नसतील, तर करदेखील का द्यावा, असे येथील ग्रामस्थांचे म्हणणे आहे. तसेच यातून भ्रष्टाचारालादेखील आळा बसेल, असे ग्रामस्थ म्हणतात. विकासकामे झाल्यास येथील लोकांना रोजगार व चांगल्या सोयी सुविधादेखील उपलब्ध होतील. तसेच सर्वच कामे ग्रामस्थ करणार असल्याने निवडणुकींवरती बहिष्कार टाकण्याचा निर्णयदेखील त्यांनी घेतला आहे.

पाच्छापूर गाव व आजूबाजूचा परिसर हा ऐतिहासिक व पर्यटनदृष्ट्या अतिशय महत्त्वाचा आहे. मात्र, वर्षानुवर्षे येथील खराब रस्ते, पाणीपुरवठा, दिवाबत्ती अशा अनेक समस्या जैसे थेच आहेत. प्रशासन व लोकप्रतिनिधी याकडे अक्षरशः डोळेझाक करताना दिसत आहेत. त्यामुळे अखेर ग्रामस्थांनी एकजूट दाखवून गावांचा विकास स्वतःच करण्याचे ठरवले आहे. यास खूप चांगला प्रतिसाददेखील मिळत आहे. असंख्य लोक सढळ हस्ते पैसे व इतर प्रकारची मदतदेखील करत आहेत.

जितेंद्र गद्रे,
ग्रामस्थ

Exit mobile version