| सोलापूर | प्रतिनिधी |
राष्ट्रीय समाज पक्षाचे (रासप) अध्यक्ष महादेव जानकर यांनी सोलापुरात प्रचारादरम्यान भाजपवर जोरदार आणि आक्रमक टीका केली. भाजप स्वतःला ‘पार्टी विथ डिफरन्स’ म्हणवते, मात्र आता त्या पक्षात कोणताही फरक राहिलेला नाही, अशी घणाघाती टीका जानकर यांनी केली.
“आम्ही भाजपचे बाप आहोत. कारण आम्हीच त्यांना सत्तेत आणले होते. आम्ही जिकडे असतो, तिकडे पारडे जड असते,” असा दावा करत जानकर यांनी भाजपला थेट आव्हान दिले. पुढे ते म्हणाले, “वेळ आली तर आम्ही काँग्रेसला सत्ता देऊ, पण भाजपची जिरवू.” भाजपमधील जुन्या कार्यकर्त्यांची अवस्था अत्यंत बिकट असल्याचे सांगत जानकर यांनी सोलापुरातील भाजपचे आमदार सुभाष देशमुख आणि विजयकुमार देशमुख यांच्यावरही टीका केली. “जर आमदारांचीच अवस्था इतकी वाईट असेल, तर सामान्य कार्यकर्त्यांची अवस्था काय असेल?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला. भाजपमध्ये आज ‘ओरिजनल’ कार्यकर्त्यांना स्थान नसून, काँग्रेसमधून आलेले लोकच सत्तेचा उपभोग घेत असल्याचा आरोपही त्यांनी केला. “भाजप ही काँग्रेस झालेली नाही, तर काँग्रेसचे कार्यकर्ते भाजपात आले आहेत. त्यामुळे मूळ भाजप कार्यकर्त्यांनी फक्त सतरंज्या उचलण्याचे काम करायचे,” असा टोला त्यांनी लगावला.






