महायुती सरकारच्या छाताडावर दिबांच्या नावाचा झेंडा रोवणार!

8 जुलैला रश्मिता पोपेटा करणार आंदोलनाचे नेतृत्व

| पनवेल | प्रतिनिधी |

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दि.बा. पाटील यांचे नाव देण्यास टाळाटाळ केली जात असल्याने समाजबांधवांमध्ये उद्रेक उफाळून येताना दिसत आहे. रश्मिता पोपेटा हिने त्याकरिता आजही हॉस्पिटलमधूनही आंदोलन सुरूच ठेवले आहे. या पार्श्वभूमीवर येत्या बुधवारी, 8 जुलैला विधानभवनावर मोर्चाचे आयोजन केले जाणार आहे.

रश्मिता पोपेटा हिने आंदोलनाची दुसरी इनिंग सुरु केली आहे. तिने समाजाला पुन्हा एकदा दिबांसाठी आंदोलनाला चेतविले आहे. तिच्या उपोषणातून नवे वादळ विधानभवनावर धडकणार आहे. त्याकरिता लोकनेते दिबाप्रेमी नामकरण समितीच्या बॅनरखाली एकजुटीने आंदोलक रस्त्यावर उतरणार आहेत. आंदोलनाची सुरुवात पनवेल शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकातून महाराजांना पुष्पहार घालून रश्मिताच्या हस्ते नारळ वाढवून होईल, अशी माहिती समितीचे प्रमुख सदस्य माजी आमदार बाळाराम पाटील यांनी दिली.

पुढे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला पुष्पहार अर्पण करुन मोर्चा एसटी स्टॅण्डमार्गे कळंबोलीकडे आणि तेथून मुंबईच्या दिशेने रवाना होईल. मोर्चात सुमारे 15 हजार आंदोलक सहभागी होतील. त्याकरिता पनवेल, उरण तालुका आणि शहरी भागात गाव बैठकांचे आयोजन करण्यात आले आहे. याशिवाय रोहा, पेण, अलिबाग, खालापूर, चौक कर्जत, ठाणे, नवी मुंबई, कल्याण, भिवंडी, वसई, विरार, पालघर आदी भागातून समाजबांधव सहभागी होणार आहेत, अशीही माहिती त्यांनी दिली.

रश्मिता पोपेटा हिच्या आंदोलनाना पाठिंबा देणाऱ्या महिला संघटना, कलाकार संघटना, बैलगाडा संघटना, 27 गाव संघटना, 10 गाव संघटना, विविध राजकीय पक्ष, सामाजिक संस्था, औषध विक्री संघटना, आगरी समाज संघटना अशा विविध संघटना मोर्चात सक्रिय सहभाग घेणार असल्याचे त्या संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी कळविले आहे. याशिवाय व्यक्तिगत काही लोकं स्वयंस्फूर्तीने सहभागी होणार असल्याने हे आंदोलन अभूतपूर्व ठरणार आहे, असा दावा सामाजिक कार्यकर्ते कांतीलाल कडू यांनी केला.

कोविड काळात राज्य सरकारविरोधी आंदोलने झाली. परंतु, महायुतीने नावाबाबत जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याने आंदोलने होऊ शकली नाहीत, ही वस्तुस्थिती आहे. त्यात आम्हीही कमी पडलो असलो तरी ती कसूर येत्या 8 तारखेच्या आंदोलनातून भरून काढणार आहोत, अशी भूमिका दिशा पाटील यांनी स्पष्ट केली.
संबंधित आंदोलनासंदर्भात राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राज्याचे पोलीस महासंचालक सदानंद दाते, मुंबईचे पोलीस आयुक्त देवेन भारती, आझाद मैदान पोलीस ठाणे, नवी मुंबईचे पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे, कोकण आयुक्त रुबल अग्रवाल, पनवेल तहसीलदार मीनल भामरे भोसले, पनवेल शहर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळा कुंभार आदींना आंदोलनाची माहिती लेखी निवेदनाद्वारे लोकनेते दिबाप्रेमी नामकरण समितीच्या लेटरहेडवर दिली आहे, असेही कांतीलाल कडू यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले.

आंदोलनात स्वतः रश्मिता पोपेटा, खासदार बाळ्यामामा ऊर्फ सुरेश म्हात्रे, माजी आमदार बाळाराम पाटील, सामाजिक कार्यकर्ते कांतीलाल कडू, माजी आमदार मनोहर भोईर, उरणच्या नगराध्यक्षा भावना घाणेकर, सुधाकर पाटील, स्थानिक सामाजिक संस्थांचे पदाधिकारी सहभागी होतील. पत्रकार परिषदेला बाळाराम पाटील, मनोहर भोईर, भावना घाणेकर, संतोष घरत, अतुल म्हात्रे, काशिनाथ पाटील, नरेश घरत, हेमराज म्हात्रे, प्राजक्ता गोवारी, शंकर म्हात्रे, तेजस्विनी घरत, सुनील कटेकर, रवी घरत, विलास फडके, कवी तारेकर, सचिन गायकवाड, महेंद्र म्हात्रे याशिवाय अन्य मान्यवर उपस्थित होते.

Exit mobile version