महिला बचत गटांच्या विकासासाठी निधी आपण उपलब्ध करू – पालकमंत्री आदिती तटकरे

। माणगाव । प्रतिनिधी ।
महिला बचत गट विकसित करण्याच्या दृष्टीने लागणारा सर्व निधी आपण उपलब्ध करू असे प्रतिपादन रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री आदिती तटकरे यांनी माणगाव तालुक्यातील निजामपूर येथील महिला बचत गट मार्गदर्शनपर शिबीर व हळदी कुंकू कार्यक्रमात बोलताना व्यक्त केले.

माणगाव तालुक्यातील निजामपूर ग्रामपंचायत कार्यालयाच्या पटांगणात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पुरस्कृत महिला बचत गट मार्गदर्शन शिबीर व हळदी कुंकू कार्यक्रम रविवारी (दि.१) आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाच्या प्रमुख अतिथी म्हणून पालकमंत्री आदिती तटकरे यांनी उपस्थित महिला बचत गटांना बहुमोल असे मार्गदर्शन केले. महिला बचत गटांना सहकार्य करण्याचे काम हे जिल्हापरिषदेच्या त्याचबरोबर त्याच्या विभागाच्या माध्यमातून निश्चितपणाने राहील. आपणही काहीतरी आपलं उत्पादन करावं, आपणही स्वतःचे काही दोन पाच रुपये कमवावे भलेही ते घरातल्या पुरुषापेक्षा कमी असो पण ते माझ्या हक्काचे असायला हवेत. या महिलांनी स्वतःच्या वैयक्तिक म्हणजे घरातल्या संसाराच्या जबाबदारीच्या पलीकडे स्वतःसाठी एक स्थान निर्माण करण्याचा खऱ्या अर्थानं कष्टानी प्रयत्न केला आणि आज त्याचं चीज होताना दिसत आहे. असे पालकमंत्री आदिती तटकरे यावेळी मार्गदर्शन करताना म्हणाल्या.

या कार्यक्रमास निजामपूर ग्रामपंचायतीचे सरपंच राजाभाऊ रणपिसे, महाड विधानसभा मतदार संघाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष बाबूशेठ खानविलकर, माणगाव तालुका संजय गांधी निराधार योजना समितीचे अध्यक्ष तुकाराम सुतार, निजामपूर विभाग राष्ट्रवादीचे अध्यक्ष संदीप जाधव, रायगड जिल्हा प्रकल्प संचालक डॉ.ज्ञानदा फणसे, निजामपूर शहर राष्ट्रवादीचे अध्यक्ष महेश शिर्के, निजामपूर विभाग राष्ट्रवादी काँग्रेसचे सचिव किरण पागार, जिल्हा अभियान व्यवस्थापक सचिन चव्हाण, जिल्हा व्यवस्थापक (डी.एम.मार्केटिंग) सिद्धेश राऊळ, जिल्हा व्यवस्थापक (डी.एम – आय.बी.सी.बी.) चंद्रशेखर पाटील, जिल्हा व्यवस्थापक(बी.एम.-एम.आय.एस.) उज्वला जगताप, जिल्हा व्यवस्थापक (डी.एम.-कृती संगम) शिरीष पाटील, माणगाव पंचायत गटविकास अधिकारी वाय.एम.प्रभे, सहाय्यक गटविकास अधिकारी शुभांगी नाखले, तालुका अभियान व्यवस्थापक मनीषा मुसळे, प्रभाग समन्वयक प्रभाग गोरेगाव वर्षा इनामदार, प्रभाग समन्वयक प्रभाग मोर्बा स्वप्नील गोसावी, प्रभाग समन्वयक प्रभाग तळाशेत संजय राठोड, प्रभाग समन्वयक प्रभाग निजामपूर बालाजी करळे, बचत महासंघाच्या देविका पाबेकर, क्रांती प्रभाग संघ निजामपूर अध्यक्ष रुकसाना फटाके, सचिव यास्मिन कागदी, उपाध्यक्ष दीपिका बाईत आदी मान्यवरांसह महिला बचत गटातील महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Exit mobile version