| नेरळ | प्रतिनिधी |
कर्जत तालुक्यात शेतकरी कामगार पक्षाची ताकद काय आहे हे सात जानेवारी रोजी शेकाप कार्यकर्ते दाखवून देणार आहेत. मात्र, कळंब जिल्हा परिषद गटांमध्ये आलेले आयात उमेदवार यांना त्यांची जागा दाखवली जाईल आणि येथील मतदार त्यांचे पार्सल परत पाठवतील, असा विश्वास शेकाप युवा मोर्चाचे तालुका अध्यक्ष अनिल जोशी यांनी व्यक्त केला. शेतकरी कामगार पक्ष आणि शिवसेना महायुतीच्या उमेदवारांचे पाषाणे ग्रामपंचायतीमध्ये मोठे स्वागत करण्यात आले, त्यावेळी जोशी बोलत होते.
कळंब जिल्हा परिषद गटांमधील शिवसेना शेकाप भाजप महायुतीचे उमेदवार जिल्हा परिषद गटाचे हरिश्चंद्र निरगुडा आणि पोशिर पंचायत समिती गणाच्या उमेदवार रेश्मा जोशी यांच्या प्रचार फेरीचे पाषाण गावी आयोजन करण्यात आले होते. शेतकरी कामगार पक्षाचा लाल बावटा आणि निशाणी फटारा घेऊन शेकडो कार्यकर्ते या रॅलीमध्ये सहभागी झाले होते. पाषाणे गावाचे ग्रामदैवत असलेल्या पांडवकालीन शिव मंदिर येथे या दोन्ही उमेदवार यांनी भगवान शंकराचे दर्शन घेतले.त्यानंतर ग्रामपंचायत तलावामध्ये साकारलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे दर्शन घेऊन प्रचाराला सुरुवात केली. या प्रचार फेरीमध्ये कर्जत पंचायत समितीचे माजी सभापती राहुल विशे, शेकापचे पदाधिकारी आणि जिल्हा बँकेचे माजी संचालक तसेच कर्जत कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती प्रकाश फराट,शेकाप कार्यालयीन चिटणीस दत्ता राणे, साळोख ग्रामपंचायत सरपंच स्मिता फराट, पोशिर ग्रामपंचायत सरपंच आरती राणे, तसेच साळोख ग्रामपंचायत उपसरपंच मुसा जुवारी, माजी उपसरपंच असीम बुबेरे तसेच माणिवली ग्रामपंचायत माजी सरपंच लहू डायरे, प्रवीण डायरे, प्रमुख कार्यकर्ते महेश शेळके, शिवसेना ठाकरे पक्षाचे विभाग संपर्क प्रमुख रामचंद्र बदे आदी उपस्थित होते. पाषाणे गावातील प्रचार फेरी मध्ये नंतर शेकाप जिल्हा खजिनदार श्रीराम राणे हे देखील सहभागी झाले. प्रचाराची फेरी मध्ये उमेदवार यांच्याकडून संपूर्ण पाषाण गावातील प्रत्येक मतदाराच्या घरी जाऊन मतदारांच्या गाठीभेटी घेत होते.
याप्रसंगी शेकाप नेते प्रकाश फराट यांनी जिल्हा परिषदेचे दिवंगत सदस्य सुदाम पेमारे यांनी या गटामध्ये आपल्या कार्यकाळात 33 कोटींची विकास कामे केली होती. शेतकरी कामगार पक्ष आणि शिवसेना या दोन्ही पक्षाच्या उमेदवार यांच्याकडे विकासाचे व्हिजन आहे, त्यामुळे शेकाप शिवसेना युतीच्या उमेदवार यांचा विजय निश्चित आहे असे मत मांडले.






