बेकायदेशीर खाणकामाविरोधात उपोषणाचे हत्यार

| मुरुड-जंजिरा | वार्ताहर |
मुरुड तालुक्यातील मांडला येथील सिटी सर्व्हे नंबर 188/2 अ या जमिनीमध्ये जिल्हाधिकारी अथवा शासनाची कोणतीही मंजुरी न घेता बेकायदेशीर खाणकाम सुरु आहे. या खाणकामामुळे असंख्य झाडाच्या कत्तली केल्या गेल्या व डोंगराची जमीन खणल्याने भूस्खलनाचा धोका निर्माण झाला आहे.
30 एकर असणार्‍या डोंगरावर चार पोकलेन मशीन, भयानक वेगाने खाणकाम सुरु असून, याचा पर्यावरणाला मोठा धोका निर्माण झाला आहे. वेळोवेळी अर्ज देऊनसुद्धा हे बेकायदेशीर खाणकाम बंद होत नसल्याने समाजसेवक दिलीप अनंत जोग यांनी 15 ऑगस्टचा मुहूर्त साधून एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण सुरु केले होते.

या लाक्षणिक उपोषणाची दखल मुरुड तहसीलदार गोविंद वाकडे यांनी घेतली असून, खाणकाम होत असलेल्या अनधिकृत उत्खननाबाबत मंडळ अधिकारी बोर्ली, वनपरिक्षेत्र अधिकारी मुरुड, वन परिक्षेत्र अधिकारी फणसाड अभयारण्य यांच्याकडून रीतसर अहवाल मागवण्यात आला आहे. अहवाल प्राप्त होताच यथोचित कार्यवाही करण्याचे आश्‍वासन मुरुड तहसील कार्यालयाचे तहसीलदार गोविंद वाकडे यांनी लिखित स्वरूपात दिल्याने लाक्षणिक उपोषण करते दिलीप जोग यांनी आपले उपोषण मागे घेतले आहे.

Exit mobile version