जिल्ह्यातील स्थानिक प्रशासन व नागरिकांना पुढील 48 तास
थंड हवेच्या लाटेबाबत सतर्कतेचा इशारा

| अलिबाग | विशेष प्रतिनिधी |
भारतीय हवामान विभागाच्या दिनांक 25 जानेवारी, 2022 रोजीच्या पुर्वसूचनांनुसार उत्तर कोंकण प्रदेशामध्ये थंड हवेच्या लाटेमुळे (Cold wave) या भागातील तापमानामध्ये मोठयाप्रमाणात घट होण्याची शक्यता राहील. थंड हवेच्या लाटेमुळे धुके, दवं इ. मुळे दृश्यमानता कमी राहिल. त्यामुळे रायगड जिल्ह्यातील स्थानिक प्रशासन व नागरिकांना पुढील 48 तास थंड हवेच्या लाटे (Cold wave) बाबत सतर्कतेचा इशारा देण्यात येत आहे.

या काळामध्ये नागरिकांनी विशेषतः वयोवृध्द व्यक्ती, दमा (अस्थमा)चा आजार असणारे व्यक्ती, महिला, लहान मुले, आजारी व्यक्ती यांनी विशेषतः त्यांच्या आरोग्याची काळजी घ्यावी. गंभीर आजारी व्यक्तींनी वैद्यकिय सल्ला घ्यावा. रात्रीच्या वेळी तापमानामध्ये अचानक घट झाल्यामुळे थंडीचे प्रमाण वाढण्याची शक्यता राहील. या काळामध्ये उबदार वातावरणामध्ये रहावे. थंडीपासून बचाव करण्यासाठी अंगावर पुरेसे उबदार कपडे वापरावेत. जनावरे/पाळीव पशु पक्षी यांची देखील आवश्यक काळजी घेण्यात यावी. सकाळच्या वेळी हवेमध्ये मोठ्याप्रमाणात धुके व दवं असल्याने दृश्यमानता कमी झालेली असते. अशावेळी वाहनांचा अपघात होण्याची दाट शक्यता असते. याकाळात वाहनांचे दिवे लावून व कमी वेगाने वाहने चालवावित. अपघात टाळावा. विशेषतः घाट माथ्यावर/रस्त्यावर वाहने सावकाश चालवावीत, असे जिल्हा प्रशासनाकडून कळविण्यात आले आहे.

Exit mobile version