ऐनघरमध्ये अवैध धंद्यांना ऊत

कारवाई करण्याची नागरिकांची मागणी
। सुकेळी । वार्ताहर ।
सद्यस्थितीत रायगड जिल्ह्यासह रोहा तालुक्यामध्ये अनेक ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे अवैध धंदे सुरू आहेत. यामध्ये रोहा तालुक्यातील नागोठणे विभागातील अनेक ठिकाणी गावठी दारू, गोवा – गुटख्याची विक्री तेजीत सुरु असून काही ठिकाणी बेकायदेशीर जुगार क्लबच्या अड्ड्यांचे व्यवसाय देखिल जोमाने सुरू आहेत. या सर्वच गोष्टींकडे स्थानिक पोलिस कानाडोळा करीत असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.
ऐनघर ग्रामपंचायत हद्दीमधिल वाकण-बाळसई मार्गावरील गेल ऑफीसच्या समोरच एका घरामध्ये अनेक दिवसांपासून मोठ्या प्रमाणात राजरोसपणे बेकायदेशीर जुगार क्लब सुरु आहे. सकाळपासुन ते रात्री उशिरापर्यंत या ठिकाणी वाहनांची मोठ्या प्रमाणात गर्दी दिसून येते. या सुरु असलेला जुगारी क्लबचा परिणाम येथिल तरुणांवर होत असून या विभागातील अनेक तरुण या जुगारी क्लबच्या आहारी गेले आहेत. याबाबतीत या ठिकाणी मोठ्या प्रमाणात सुरु असलेला जुगारी क्लबचा अड्डा बंद करण्यात यावा यासाठी नुकताच ऐनघर ग्रामपंचायतीने ठराव मंजूर करण्यात आला असून याबाबतीत स्थानिक पोलिसांनी लवकरात लवकर हे जुगारी अड्डे बंद करण्यात यावेत अशी मागणी देखिल ऐनघर ग्रामपंचायतीचे सदस्य किशोर नावले यांनी केली आहे.

Exit mobile version