। रायगड । जिल्हा प्रतिनिधी ।
शेतकरी कामगार पक्षाच्या स्थापनेपासूनचा इतिहास आजच्या पिढीला माहिती असावा, यासाठी शेकाप वर्धापन दिनानिमित्त वेबसाईटचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. त्यामुळे आता घरबल्या शेतकरी कामगार पक्षाच्या स्थापनेपासून सर्वसामान्य शेतकरी, कष्टकरी, कामगारांसाठीचा लढा, आंदोलनाची माहिती उपलब्ध होणार आहे. ज्या नेते मंडळींनी पक्षासाठी काम केले, त्या सर्व नेतेमंडळींची नावे, माहिती आणि इतिहास या वेबसाईटद्वारे समजणार आहे. दरम्यान, सभासद नोंदणीही आधुनिक पद्धतीने केली जाणार आहे.
यावेळी शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस जयंत पाटील, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सकपाळ, आ. रोहित पाटील, आ. बाबासाहेब देशमुख, माजी. आ. बाळाराम पाटील, एस.व्ही. जाधव, कार्यालयीन चिटणीस राजेंद्र कोरडे, शेकापचे जिल्हा चिटणीस सुरेश खैरे, अलिबाग अर्बन बँकेच्या अध्यक्षा सुप्रिया पाटील, शेकाप प्रवक्त्या चित्रलेखा पाटील, रायगड बाजारचे चेअरमन नृपाल पाटील, शेकाप महिला आघाडी प्रमुख ॲड. मानसी म्हात्रे, कामगार आघाडी प्रमुख प्रदीप नाईक, खजिनदार अतुल म्हात्रे, अनिकेत देशमुख, शेकाप जिल्हा सहचिटणीस ॲड. गौतम पाटील, संतोष जंगम, शेकाप जिल्हा महिला आघाडी प्रमुख शिवानी जंगम, अलिबागच्या नगराध्यक्ष अक्षया नाईक, माजी नगराध्यक्ष प्रशांत नाईक, पनवेलचे अरविंद म्हात्रे, नारायण घरत, खालापूरचे किशोर पाटील, अलिबाग तालुका चिटणीस सुरेश घरत, जिल्हा चिटणीस मंडळाचे पदाधिकारी, सभासद, वेगवेगळ्या आघाडीचे पदाधिकारी, सभासद, पक्षाचे सर्व तालुका चिटणीस, पदाधिकारी, सदस्य व कार्यकर्ते, महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
मीनाक्षी पाटील यांच्यासह अनेकांना श्रद्धांजली
शेतकरी कामगार पक्षाच्या वर्धापन दिनानिमित्त पक्षातील दिवंगत नेते मंडळींना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. यामध्ये पक्षाच्या स्थापनेपासून असलेल्या नेतेमंडळींसह शेकापच्या माजी राज्यमंत्री मीनाक्षी पाटील तसेच शेवटपर्यंत पक्षासाठी काम करणाऱ्यांना आदरांजली अर्पण करण्यात आली. तसेच नीट पेपरफुटी प्रकरणामुळे तणावातून जीवन संपविणाऱ्या विद्यार्थ्यांना आणि वेगवेगळ्या क्षेत्रातील दिवंगत मंडळींना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
दिग्गजांचा सन्मान
पालघर जिल्ह्यातील आदिवासी समाजातील तारपावादक भिकल्या धिंडा यांना नुकताच पद्मश्री पुरस्कार प्राप्त झाला. तसेच कराटेसह बॉक्सिंग अशा वेगवेगळ्या क्रीडा प्रकारात शौर्य मिळवून सैन्य दलात अधिकारी या पदावर असलेल्या शीतल गायकवाड या दिग्गजांचा मान्यवरांच्या हस्ते विशेष सन्मान करण्यात आला.
नृत्याविष्काराने मान्यवरांचे स्वागत शेतकरी कामगार पक्षाच्या वर्धापन दिनानिमित्त नृत्याविष्काराचा सोहळा आयोजित करण्यात आला होता. खालापूरमधील विद्यार्थिनींनी नृत्य कला सादर करून मान्यवरांचे अनोख्या पद्धतीने स्वागत केले. तसेच तारपा वादक भिकल्या धिंडा यांच्या तारपा वाद्याने उपस्थित भारावून गेले. एक पारंपरिक वाद्य टिकवून ठेवण्याचे काम धिंडा यांनी केल्याने त्यांचे कौतुकही करण्यात आले.
