आचारसंहितेमुळे चिंताग्रस्त व्यवसायिकांना मिळाला दिलासा
| दिघी | वार्ताहर |
पश्चिम किनारपट्टीवर सातत्याने निर्माण होणारी वादळसदृश्य परिस्थिती, अवकाळी पाऊस यामुळे पर्यटन व्यवसाय चिंताग्रस्त बनला आहे. अगोदरच कर्जाच्या विळख्यात अडकलेले पर्यटन व्यावसायिक ऐन दिवाळी पर्यटन हंगामात लागलेल्या निवडणूक आचारसंहितेमुळे आणखी अडचणीत आले असता, या विकेंडला पर्यटकांची तोबा गर्दी झाल्याने दिलासा मिळाला आहे.
मे महिन्यातील लोकसभा निवडणुका आणि आता ऐन दिवाळीच्या हंगामात लागलेल्या निवडणूक आचारसंहिताचा फटका या तालुक्यातील पर्यटन व्यावसायिकांना बसण्याची भीती कायम वाटत होती. गेल्या काही वर्षांपासून पश्चिम किनारपट्टीवर वादळे धडकू लागले आहेत. यामुळे वादळसदृश्य परिस्थिति निर्माण होत असून, परिणामतः अवकाळी पाऊस पडत आहे.
मागे मे महिन्यात शालेय सुट्ट्या व पर्यटन हंगामात लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागल्याने त्याचा परिणाम पर्यटनला बसला होता. आतासुद्धा ऐन दिवाळीच्या हंगामात विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्याने दिवाळीच्या हंगामात पर्यटकांनी पाठ फिरवल्याचे चित्र दिवाळीच्या सुट्टीत दिसून येत होती. मात्र, या शनिवार-रविवारी पर्यटकांचा ओघ वाढल्याने दिवाळी पर्यटन हंगामातला विकेंड हाऊसफुल्ल ठरला आहे.
पुन्हा आचारसंहिता
विधानसभा निवडणुकीनंतर पुन्हा ग्रामपंचायत, नगरपालिका, पंचायत समिति आणि जिल्हा परिषदांच्या निवडणुका लागण्याची शक्यता आहेत. त्यामुळे पुढील डिसेंबर ते मे महिना या शेवटच्या दिवसात पर्यटनाला मिळणार्या सुगीच्या दिवसांत पुन्हा आचारसंहिता लागत राहणार असल्याचे दिसत आहे.
दिवाळी हंगाम ठरला दोन दिवसाचा
दिवेआगरमध्येच महाराष्ट्र पर्यटन विकास मंडळ परवाना अंतर्गत निवास आणि न्याहरीचे 180 हून अधिक हॉटेल व घरगुती साधारण 160 व याव्यतिरिक्त 25 एक प्रमुख खानावळी असून, 210 हून अधिक दर्जेदार होम स्टे आहेत. मात्र, पूर्ण दिवाळी सुट्टीत एकच वीकेंडला दिवेआगर परिसर हाऊसफुल्ल दिसून आला.