वेलकम बॅक टू स्कूल…

ज्ञानमंदिरात घुमले प्रार्थनेचे सूर, अन किलबिलाट
पनवेलमध्ये पुष्पवृष्टीने विद्यार्थ्यांचे स्वागत
पनवेल | साहिल रेळेकर |
तब्बल दीड वर्षानंतर पनवेलमधील बच्चे कंपनीने शाळांमध्ये पाऊल पडले.या बच्चेकंपनीचे विविध शाळांमधून पुष्पृष्टीने स्वागत करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या आगमनाने दीड वर्षानंतर सर्वच ज्ञानमंदिरात सामूहिक प्रार्थनांचे सूर उमटले आणि बच्चेकंपनींच्या किलबिलाटांनी शाळांच्या इमारती बोलक्या झाल्या.
राज्य शासनाच्या आदेशानुसार पनवेल महापालिका क्षेत्रात गेल्या काही दिवसांपासून बंद असलेल्या शाळा बुधवारी (दि.15 डिसेंबर) सुरू करण्यात आल्या आहेत. शहरी भागातील पहिली ली ते सातवीचे वर्ग असलेल्या सर्व माध्यमांच्या व व्यवस्थापनांच्या सर्व शाळा सुरक्षितपणे सुरू करण्याच्या मार्गदर्शक सूचना आयुक्त गणेश देशमुख यांनी दिल्या असून त्याप्रमाणे बुधवारपासून महापालिका क्षेत्रातील शाळा सुरू झाल्या आहेत. तसेच महापालिकेच्याही अकरा शाळा आजपासून सुरू झाल्या आहेत.
शाळेच्या पहिल्याच दिवशी आयुक्त गणेश देशमुख, अतिरिक्त आयुक्त तृप्ती सांडभोर, शिक्षणाधिकारी बाबासाहेब चिमणे यांनी पनवेल महापालिकेच्या छोटा खांदा, कामोठे येथील इंग्लिश मिडियम स्कूल या शाळांना भेटी देऊन गुलाबपुष्प, चॉकलेटस्, शैक्षणिक साहित्य देऊन विद्यार्थ्यांचे स्वागत केले. तसेच शाळांची पाहणी करून सूचनाही दिल्या. शाळेत येणार्‍या विद्यार्थ्यांवर शिक्षकांकडून पुष्पवृष्टी करून त्यांचे गुलाबपुष्प देऊन स्वागतही करण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांच्या चेहर्‍यावर समाधान पाहायला मिळाले.
यावेळी सीबीएससी बोर्डच्या मुख्याध्यापिका अर्चना खाडे, स्टेट बोर्डच्या मुख्याध्यापिका स्वप्नाली म्हात्रे, रयत शिक्षण संस्थेचे रायगड जिल्हा पीआरओ बाळासाहेब कारंडे, मुख्याध्यापिका मुक्ता खटावकर यांच्यासह आदी उपस्थित होते.

स्कूलबससाठी प्रस्ताव
विद्यार्थ्यांना शाळेत येण्याजाण्याकरिता स्कुलबससाठी पालकांकडून प्रतिसाद मागवले जात आहेत. बस सेवा सुरू करण्यासाठी पालकांकडून फॉर्म भरून घेतले जात आहेत. विद्यार्थ्यांच्या प्रतिसादानुसार लवकरच बस सेवा देखील सुरु करण्यात येईल, अशी माहिर्ती मुख्याध्यापिका स्वप्नाली म्हात्रे यांनी दिली.

शाळा सुरू करण्यापूर्वी पालिकेकडून शाळांची पाहणी पूर्ण करून योग्य सूचनाही देण्यात आलेल्या आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव अजूनही पूर्णपणे संपलेला नाही त्यामुळे शाळा सुरू केल्यानंतर याचा कसा परिणाम होतोय, याबाबत पुढील आठ दिवसांत उपाययोजना केल्या जातील.
गणेश देशमुख – आयुक्त,मनपा

इतक्या दिवसानंतर शाळा पुन्हा एकदा सुरू झाल्याने खूप आनंद होत आहे. शाळेच्या परिसरात केलेली सजावट आकर्षक आहे. कोरोनामुळे शाळेतील सर्व शिक्षक आम्हा विद्यार्थ्यांची काळजी घेत आहेत.
देवांशी दीपक सावंत, विद्यार्थीनी

Exit mobile version