भारतीय हवामान खात्याने सोमवारी मुंबई, ठाणे आणि रायगडच्या काही भागात पुढील दोन दिवस उष्णतेची लाट येण्याची शक्यता वर्तवली असून या भागांत सावधगिरी बाळगण्याचा इशारा जारी केला आहे. रविवारी मुंबईत तापमानाचा पारा 38.6 अंश सेल्सिअसवर गेला होता. हे तापमान 39 अंश सेल्सिअसपर्यंत येत्या काही दिवसांत वाढण्याची शक्यता वर्तवली आहे. पुढील दोन दिवस मुंबईत किमान किंवा रात्रीचे तापमान 24 अंशांपर्यंत वाढण्याची शक्यता आहे. जेव्हा कोणत्याही किनारपट्टीच्या प्रदेशाचे तापमान 37 अंशांपर्यंत पोहोचते आणि त्यात साडेचार ते 6.4 अंशांच्या दरम्यानचा बदल गृहित असतो. म्हणजे हे तापमान या दरम्यान वाढून चाळीसच्या पुढे जाऊ शकते. जेव्हा तापमान वाढीचा 6.5 अंशांचा टप्पा ओलांडते आणि ही स्थिती आणखी दोन दिवस टिकून राहते तेव्हा हवामान विभाग तीव्र उष्णतेच्या लाटेचा इशारा जारी करतो. अलिबाग तसेच अन्य किनारपट्टीतील भागांत गेल्या आठ दहा दिवसांपासून सातत्याने वाढत असल्याचे जाणवत होतेच, त्यात आता हवामान खात्याने अधिकृतपणे तापमान वाढण्याचे संकट नोंदवले आहे. दोन आठवड्यांपूर्वी महाराष्ट्राने अवकाळी पावसाचा फटका अनुभवला. दरवर्षी पाऊस असो वा उन्हाळा, त्याची तीव्रता तसेच अनियमितता वाढत असल्याचे रायगड, पालघर, मुंबई तसेच रत्नागिरी जिल्ह्यांनी अनुभवली आहे आणि त्यातून मोठे नुकसानही सोसले आहे. समुद्राची पातळी वाढत असल्याचा धोका, असे उच्च वाढत असलेले तापमान आणि हवामान बदलाच्या प्रभावामुळे मुंबईसारख्या किनारपट्टीवरील शहरांसाठी धोका वाढलेला आहे, हे गेल्या काही महिन्यांत वारंवार सांगितले जात होतेच. त्यामुळे त्या पार्श्वभूमीवर मुंबई शहरासाठी पहिल्या-वहिल्या मुंबई क्लायमेट अॅक्शन प्लॅनचे रविवारी करण्यात आलेले उद्घाटन महत्त्वाचे ठरते. कारण, यामध्ये 2050 सालापर्यंत हवामान बदलासाठी तसेच तापमान वाढीसाठी कारणीभूत हरितगृह वायू उत्सर्जनाचे प्रमाण निव्वळ-शून्य पातळीवर आणण्याचे त्यात उद्दिष्ट आहे. या योजनेअंतर्गत अल्पकालीन आणि दीर्घकालीन उद्दिष्टांमध्ये 2030 सालापर्यंत उत्सर्जनात 30 टक्के घट करणे, 2040 पर्यंत 44 तर 2050 सालापर्यंत हे प्रमाण शंभर टक्के करुन उत्सर्जन शून्यावर आणणे अशा टप्प्यांचा समावेश आहे. या मोजमापासाठी 2019 सालचे उत्सर्जन आधारभूत मानले जाणार असून ते 23.42 दशलक्ष टन कार्बन डायऑक्साइड असे मानले गेले आहे. सोप्या शब्दांत सांगायचे तर हे प्रमाण प्रति व्यक्ती 1.8 टन कार्बन डायऑक्साइड असे मोजले गेले आहे. केंद्र सरकारने 2070 सालापर्यंत निव्वळ शून्य उत्सर्जनाची पातळी गाठण्याचे लक्ष्य ठेवले असून त्याच्या दोन दशकांपूर्वी मुंबई महानगर पालिकेने आपल्या शहरापुरते हे ध्येय साध्य करण्याचा निर्धार जारी केला आहे. ग्लोबल वॉर्मिंग अथवा तापमान वाढ हा सगळ्या जगाला भेडसवणारा प्रश्न असून अनेक वर्षे त्याबाबत विविध राष्ट्रांत एकमत होत नव्हते. अखेर 2015 साली सर्व देशांनी जागतिक तापमानवाढीचा धोका खरा असून त्यावर त्वरेने उपाययोजना करायला हव्यात यासाठी पॅरीस येथील परिषदेत करार केला. त्यानुसार जगाचे तापमान येत्या काही दशकांत औद्योगिकीकरणाच्या आधीच्या पातळीच्या तुलनेत दोन अंश, शक्यतो दीड अंशांपर्यंत रोखण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले. त्याचाच उल्लेख मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुंबई शहरासाठी महत्वाकांक्षी योजनेच्या उद्घाटनप्रसंगी केला. पर्यावरण आणि पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी स्थानिक स्तरावर हवामान बदलाबाबत कृती करण्यास लोकांना उद्युक्त करणे हे आमचे ध्येय असल्याचे म्हटले आहे. त्यासंदर्भात त्यांनी महाराष्ट्रातील विविध भागांनी अलिकडच्या काळात अनुभवलेल्या चक्रीवादळ, शहरी पूर आणि अवकाळी पाऊस आदी विविध हवामान आपत्तींचा उल्लेख केला. यासाठी सगळ्यांना सोबत घेऊन काम करावे लागेल तसेच अनेक धोरणात्मक बदल करावे लागतील. त्यासाठी राजकीय एकमत साध्य करण्यापासून लोकांना पर्यावरणस्नेही बनण्यासाठी प्रोत्साहन देण्यापर्यंत अनेक गोष्टी कराव्या लागतील. मोठ्या प्रमाणात नवीन तंत्रज्ञानात गुंतवणूकही करावी लागेल. कचरा व्यवस्थापनापासून शहरात हरितपणा आणून जैवविविधता निर्माण करण्यापर्यंत आणि जलसंवर्धन आणि पूर जोखीम व्यवस्थापनापासून स्वच्छ तंत्रज्ञानाचा स्वीकार करत, त्याच्या प्रभावी नियमांची अंमलबजावणी करण्यापर्यंत विविध पातळीवर काम करावे लागेल. अशी कृतीयोजना आखणारे मुंबई हे आशियातील पहिले शहर असून त्याचे अनुकरण करण्याची प्रेरणा अनेकांना मिळेल आणि महाराष्ट्र तथा देश बदलेल अशी आशा आहे. त्याचा फायदा आपल्या पुढच्या पिढ्यांना मिळेल, यात शंका नाही.
स्वागतार्ह पाऊल

- Categories: संपादकीय, संपादकीय
- Tags: alibagEditorialmarathi newsmarathi newspaperraigad
Related Content
दरडग्रस्तांच्या दुर्दैवाची कहाणी - भाग 1
by
Antara Parange
July 25, 2025
Success Story! रायगड जिल्हा परिषदेच्या नवीन सीईओ- नेहा भोसले
by
Antara Parange
April 2, 2025
वसंत गुरुजी- निष्ठावंत मार्गदर्शक हरपला: जयंत पाटील
by
Antara Parange
March 18, 2025
जिद्दीने भरले ‘ती’च्या पंखात बळ
by
Antara Parange
March 8, 2025
जिद्दीने भरले ‘ती’च्या पंखात बळ
by
Antara Parange
March 8, 2025
अनेकांचे जीव वाचवणारी रुचिका
by
Antara Parange
March 8, 2025