नववर्षाचे स्वागत शासनाच्या नियमांनुसार करा

। पनवेल । वार्ताहर ।

गतवर्षाला निरोप व नववर्षाचे स्वागत करताना शासनाने आखून दिलेल्या सर्व नियमांचे पालन करून स्वागत करा, असे आवाहन पनवेल तालुका पोलीस ठाण्याचे वपोनि अनिल पाटील यांनी पनवेल तालुका पोलीस ठाणे मंथन हॉल याठिकाणी 31 डिसेंबर गत वर्षाला निरोप व नव वर्षाचे स्वागत या अनुषंगाने पोलीस ठाणे हद्दितील असणारे फार्म हाऊस/रिसॉर्टचे चालक मालक यांच्या एकत्रितपणे बैठकीत केली आहे.

या बैठकीत उपस्थितांना मार्गदर्शन करताना वपोनि अनिल पाटील यांनी सांगितले की, आपण आपल्या मालकीच्या/ताब्यात असलेल्या जागेत नववर्षाच्या स्वागता निमित्त आयोजित करत असलेल्या कार्यक्रमाच्या ठिकाणी कार्यक्रमात सहभागी होणार्या लोकांचे जीवितास कोणत्याही प्रकारे धोका होणार नाही, याची संपूर्ण जबाबदारी आपण घ्यावी. महिला सुरक्षेच्या अनुषंगाने योग्य त्या उपाययोजना कराव्यात. महिलांची छेडछाड होणार नाही याबाबत दक्षता घ्यावी.

तसेच सदर कार्यक्रमास कोणी मद्यपान केले असल्यास त्यांना सुरक्षितपणे त्यांच्या राहत्या घरी सोडण्याची उपाय योजना करावी. सदर कार्यक्रमास आपले फार्म हाऊस, रिसॉर्ट, हॉटेल-रेस्टॉरंट या ठिकाणी कोणीही ड्रग्स अमली पदार्थाचे सेवन किंवा इतर कोणतेही मादक पदार्थाचे सेवन करणार नाही अथवा ठेवणार नाही, तसे आढळल्यास संबंधितावर योग्य ती कायदेशीर कडक कारवाई करण्यात येईल असे सांगितले. यावेळी तालुका हद्दीतील मोठ्या प्रमाणात फॉर्म हाऊस मालक-चालक, हॉटेल व्यावसायिक उपस्थित होते.

Exit mobile version