जंगलातील विहिरी फॉरेस्ट गार्डनसाठी वरदान

। नेरळ । प्रतिनिधी ।

माथेरान शहरात असलेल्या जंगलभागात मोठ्या प्रमाणात नैसर्गिक झरे आहेत. त्याचवेळी ब्रिटिशकाळापासून विहिरी देखील आहेत. त्यातील अमन लॉज भागातील विहीर तेथील फॉरेस्ट गार्डनसाठी मदतगार ठरत आहे.

माथेरान हे डोंगराच्या माथ्यावर वसलेले थंड हवेचे ठिकाण आहे. या शहरातील मोठ्या प्रमाणात झाडे असून त्या झाडांमुळे पर्यटक थंड हवेचा आस्वाद घेण्यासाठी येत असतात. त्यात माथेरान हे वन जमिनीवर बसले असल्याने वन विभागाची जबाबदारी देखील मोठी आहे. त्यामुळे वन विभागाकडून जंगल राखण्याचे आणि जंगलाचे संवर्धन करण्याचे काम करण्यावर भर दिला जात असतो.त्याच जंगलामध्ये मोठ्या प्रमाणात नैसर्गिक झरे आहेत आणि त्यामुळे जंगलात असंख्य ठिकाणी पाण्याचे सोय होत शकते. मात्र माथेरानमध्ये खोदकाम करायला बंदी असल्याने नव्याने विहिरी किंवा लहान धरण बांधता येत नाहीत. परंतु ब्रिटिश काळापासून माथेरानचे जंगल भागात, प्रामुख्याने बंगलो भागात विहिरी बांधून ठेवल्या गेल्या होत्या. त्या विहिरीमधील पाणी आजही वापरले जात असून वन अमन लॉज स्थानकाच्या परिसरात असलेल्या विहिरीचे पाणी वन विभागाकडून वापरात येत आहे.

माथेरानमध्ये वनविभागाचे गार्डन असून या काही एकरामध्ये असलेल्या गार्डनमध्ये असलेल्या झाडांना पाण्याचा पुरवठा हा वन विभाग यांच्याकडून विहिरीमधील पाणी उचलून त्याद्वारे केला जातो. त्या विहिरीमध्ये चांगला पाणी साठा असल्याने विहिरी मधील पाण्यात वीज पंप टाकण्यात आला आहे. त्या पंपाद्वारे पाणी हे तेथून फॉरेस्ट गार्डनमध्ये नेले जाते. फॉरेस्ट गार्डनमधील झाडांना ते पाणी त्यांचे संवर्धन करण्यासाठी घातले जाते. ब्रिटिश काळापासून असलेल्या त्या विहिरीमुळे माथेरानचे अमन लॉज भागात असलेले फॉरेस्ट गार्डन हे महाराष्ट्र राज्य पर्यटन महामंडळाच्या रिसॉर्टमध्ये आलेल्या पर्यटकांसाठी पर्वणी ठरत आहे. वनविभागाचे वन क्षेत्रपाल उमेश जंगम आणि वन पाल राजवर्धन आडे यांच्या कडून फॉरेस्ट गार्डनची देखरेख ठेवली जात आहे. या गार्डनला पुन्हा सुवर्ण काळ मिळवून देण्यासाठी वन विभागाकडून प्रयत्न सुरू आहेत.

Exit mobile version