| पनवेल | प्रतिनिधी |
कामोठे येथील सेक्टर 35 मधील गृहनिर्माण सोसायटीतील एका सदनिकेतून 11 लाखांचे दागिने चोरीला गेले. ही चोरी नक्की कधी झाली व कोणी केली याची माहिती तक्रारदार महिलेला कळू शकली नाही. या सोसायटीमध्ये गरब्याचे आयोजन केले असून, यासाठी महिला आणि त्यांचे कुटुंबीय दरवाजा उघडा ठेऊन गेले होते. त्यावेळी ही घटना घडली. या प्रकरणी शनिवारी (दि.27) कामोठे पोलीस ठाण्यात अनोळखी चोरट्याविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
कामोठे येथील सेक्टर 35 मधील गिरीराज को.ऑप. सोसायटी ही अतिसूरक्षित सोसायटी म्हणून ओळखली जाते. या सोसायटीमध्ये सूरक्षा रक्षकापासून ते सीसीटीव्ही यंत्रणा सक्षम असल्याने शहरातील रहिवाशांमध्ये अनेकदा या गृहनिर्माण सोसायटीचा दाखला दिला जातो. याच सोसायटीमध्ये 13 व्या मजल्यावर राहणाऱ्या विलास मस्कर यांचा बांधकाम व्यवसाय आहे. विलास यांच्या पत्नीने दिलेल्या तक्रारीनूसार 16 ते 27 सप्टेंबर या दरम्यान घरातील दागिने ठेवलेल्या ठिकाणी पाहिल्यावर ते सापडले नाहीत म्हणून पोलीस ठाण्यात त्यांनी धाव घेतली. सूमारे 222.35 ग्रॅम वजनाचे 11 लाख 81 हजार 859 रुपयांचे दागिने घरात नसल्याचे त्यांनी सांगितले. या कुटूंबियांच्या हालचाली टिपून ही चोरी करण्यात आल्याचा पोलिसांचा संशय आहे. त्यामुळे सोसायटीतील अनेकांकडून याबाबतची माहिती पोलीस घेत आहेत. 11 लाख रुपयांचे सोने नेमके घरात कोणत्या ठिकाणी ठेवले, याची माहिती चोराला कशी मिळाली? असे अनेक प्रश्न या चोरी प्रकरणाचा शोध घेणाऱ्या पोलिसांसमोर आहेत. कामोठे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विमल बिडवे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि नवी मुंबई पोलिसांची गुन्हे शाखा, गुन्हे प्रकटीकरण विभाग यांच्या मार्फतीने या चोरी प्रकरणी शोध सुरू आहे.
चोरी प्रकरणी सखोल तपास सुरू आहे. अद्याप कोणालाही या प्रकरणी ताब्यात घेण्यात आले नसले तरी तांत्रिक तपास सुरू आहे. सोसायटीची सूरक्षा यंत्रणा चांगली असली तरी चोरी झाल्याने पोलीस विविध पद्धतीने चोरीचा छडा लावण्यासाठी माहिती गोळा करत आहे.
विमल बिडवे,
वरिष्ठ पोलीस निरीक्षक, कामोठे पोलीस
