वेस्ट इंडिजचा संघ भारतात दाखल

। अहमदाबाद । वृत्तसंस्था ।
टी-20 मालिकेत इंग्लंडला नमवून आत्मविश्‍वास उंचावलेला कायरन पोलार्डचा वेस्ट इंडिज संघ अहमदाबादमध्ये दाखल झाला. वेस्ट इंडिजचा संघ येत्या सहा फेब्रुवारीपासून अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये भारताविरोधात तीन वनडे सामन्यांची मालिका खेळणार आहे. वनडे मालिकेनंतर वेस्ट इंडिजचा संघ कोलकात्याच्या इडन गार्डन्स स्टेडियमवर भारताविरोधात तीन टी-20 सामन्यांची मालिका खेळणार आहे. बार्बाडोसवरुन दोन दिवसांचा प्रवास करुन वेस्ट इंडिजचा संघ अहमदाबादमध्ये दाखल झाला असे वेस्ट इंडिज क्रिकेट बोर्डाने आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे. वेस्ट इंडिज क्रिकेट बोर्डाने खेळाडूंच्या आगमनाचा व्हिडिओ देखील पोस्ट केला आहे. गुजरात क्रिकेट असोशिएशनच्या स्टेडियमवर हे तीन वनडे सामने खेळले जाणार आहेत. कोरोनामुळे रिकाम्या स्टेडियममध्ये हे सामने खेळवले जातील, असे गुजरात क्रिकेट असोशिएशनकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.

Exit mobile version