मच्छीमारांना ओल्या जवळ्याचा आधार

राजपुरी खाडीत मोठ्या प्रमाणात उपलब्ध

| मुरूड | वार्ताहर |

राजपुरी ते आगरदांडा खाडी मच्छीमारांसाठी एकेकाळी वरदान होती. परंतु दिघी पोर्ट व जंगल जेटीवरील वाहतूक वाढल्याने मासळी दुष्काळ पडल्याचे कोळी बांधवांचे म्हणणे आहे. (दि.1) जून ते (दि.31) जुलैपर्यंत मत्स्य प्रजनन काळ असल्याने मत्स्य विभागातर्फे खोल समुद्रात मासेमारी बंद ठेवण्याचे निर्देश दिले आहेत. अशा वेळी खाडीतील मासेमारी अनेकांच्या उदरनिर्वाहाचे साधन ठरत आहे. सध्या राजपुरी खाडीत ओला जवळा मोठ्या प्रमाणात मिळत आहे. याशिवाय ओले बोंबील व मांदेलीही मिळत असल्याने मच्छीमारांमधून समाधान व्यक्त होत आहे. ओला जवळा ओटीवर वा रस्त्याच्या कडेला सुकवून त्याची सुकट बनवली जाते व पायली (शेर) या मापाने पाखाडीतून विक्री होते. आगोटीची साठवण म्हणून या सुकटीला मोठी मागणी असते. ही सुकी मासळी टिकतेही चांगली. पावसाळी मोठी मासळी मिळत नाही म्हणून भाकरीसोबत सुकटीची चटणी कोकणात आवडीने खाल्ली जाते. आगरदांडा – इंदापूर महामार्गावर अनेक ठिकाणी मच्छीमार महिला ओला जवळा सुकवताना दिसतात. सध्या तापमानाचा पारा वाढल्याने सुकट लवकर वाळते आणि प्रति पायली 100 ते 120 रुपये दर मिळतो. राजपुरी खाडीत ओला जवळा सध्या मुबलक प्रमाणात मिळत आहे, त्यामुळे स्थानिक मच्छीमारांना चांगला रोजगार मिळत आहे.

Exit mobile version