असा आम्ही काय केला गुन्हा?

झाडावर खिळे ठोकून जाहिरातबाजी
| दीपक घरत | पनवेल |
झाडांवर खिळे ठोकून जाहिरात बाजी करण्यात येत असल्यास अशा जाहिरातबाजी करणार्‍या विरोधात पालिका प्रशासन कठोर भूमिका घेत असते. मात्र त्याच वेळी नवी मुंबई पालिकेतर्फे पालिका हद्दीतील रस्त्यांवर वाहन उभी करणार्‍या वाहन चालकांकडून पे अँड पार्किंग च्या नावर पैसे वसुल करण्यासाठी नेमण्यात आलेल्या कंपनी कडून परिसरातील वृक्षावर खिळे ठोकून जाहिरात बाजी करण्यात करण्यात आली आहे.

खिळे ठोकून वृक्षांना इजा पोहचवाणार्‍या या एजन्सीवर नवी मुंबई महापालिकेचे वृक्ष प्राधिकरण कारवाई करणार का असा सवाल उपस्थित करण्यात येत आहे. शहरातील अनेक वृक्षांच्या खोडावर पोस्टर, फलक, लावून जाहिरात बाजी करण्यात येत असल्याचे नेहमीच पाहायला मिळत असते. या प्रकारामुळे वृक्षांना नुकसान पोहचत असल्याचा विचार कोणीच करत नसल्याचे पाहायला मिळत असते. जाहिरातदारांकडून आपल्या फायद्यासाठी करण्यात येणारी ही कृती वृक्षासाठी हानीकारक ठरत आहे. पर्यावरण संरक्षण अधिनियम, झाडांचे संरक्षण व जतन अधिनियम आणि राष्ट्रीय हरित लवाद यांत झाडांसंदर्भात अनेक कायदे स्पष्टपणे अधोरेखित आहेत. तरीही जाहिरातदार बेजबाबदारपणे वागून झाडांवर खिळे ठोकून पोस्टर, बॅनर लावताताना दिसतात.

गंज खोडात उतरतो
खिळे कालांतराने गंजतात, तो गंज झाडांच्या खोडात उतरतो. परिणामी झाडांचे आयुष्य कमी होत जाते. यामुळे वृक्षांचे प्रमाण कमी होत असल्याने अशा प्रकारे वृक्षावर खिळे ठोकून जाहिरात बाजी करणार्‍या विरोधात पालिका प्रशासनाकडून कारवाई करण्यात येत असते. नवी मुंबई पालिका हद्दीत मात्र या विरोधी कृती होत असल्याचे पाहायला मिळत असून, पालिके मार्फत वाहन चालकांकडून पालिका हद्दीतील रस्त्यांवर वाहन उभे करणार्‍यांकडून पैसे वसूल करण्यासाठी नेमण्यात आलेल्या एजन्सीनेवाशी सेक्टर 17 मधील रस्त्यावर असलेल्या वृक्षांना खिळे ठोकून जाहिरातबाजी केल्याचे पाहायला मिळत आहे..

वृक्षाच्या खोडावर खिळे ठोकून पे अँड पार्क ची जाहिरात बाजी करण्यात आलेली असल्यास या बाबत माहिती घेऊन योग्य ती कारवाई करण्यात येईल. – नितीन नार्वेकर.उपायुक्त. उद्यान विभाग.नवी मुंबई महापालिका.

Exit mobile version