| रायगड | खास प्रतिनिधी |
अलिबाग-मुरुड विधानसभा मतदारसंघातील नागरिकांचा विकास होईल या आशेने मतदारांनी तुम्हाला विधानसभेमध्ये पाठवले होते. मात्र, गेल्या एक हजार 825 दिवसांमध्ये तुम्ही जनतेसाठी काहीच करु शकला नाहीत. त्यामुळे सहानुभूती मिळवण्यासाठी जनतेची माफी कसली मागता, अशी जोरदार टीका महायुतीतील भाजपाचे बंडखोर उमेदवार दिलीप भाईर उर्फ छोटम यांनी आमदार महेंद्र दळवी यांच्यावर केली. भोईर यांनी महायुतीच्या नाकावर टिच्चून उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यावेळी त्यांच्यासोबत समर्थक उपस्थित होते. त्यामध्ये प्रामुख्याने भाजपाचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा समावेश होता.
महायुतीमधील धर्म न पाळता दिलीप भोईर यांनी आज आपला उमेदवारी अर्ज दाखल करुन महायुतीलाचा आव्हान दिले. विशेष म्हणजे, भोईर यांनी उमेदवारी अर्ज दाखल करताना त्यांच्यासोबत भाजपाचे पदाधिकारी उपस्थित होते. तसेच भोईर यांच्या गळ्यामध्ये कमळ चिन्ह असलेला मफलरदेखील होता. त्यामुळे भाजपाचे त्यांना समथर्न आहे का, असा प्रश्न उपस्थितांना पडला.
गेल्या पाच वर्षांत आमदार महेंद्र दळवी यांनी कोणताच विकास केला नाही. दलित, कष्टकरी, शेतकरी, मच्छिमार, युवक, बेरोजगारी, उद्योग हे प्रश्न सोडवण्यात ते अपयशी ठरले आहेत. त्यामुळे त्यांना पुन्हा मतदारांपुढे मतं मागण्याचा नैतिक अधिकार राहिलेला नाही, असे भोईर यांनी अधोरेखित करण्याचा प्रयत्न केला. आमदार दळवी यांनी आपल्या आमदारकीच्या कालावधीत एकही आमसभा बोलावली नाही. दळवींमध्ये नेतृत्व, दातृत्व, कर्तृत्व, मित्रत्व नाही, असे जोरदार टीकास्त्र भोईर यांनी सोडले.
कोट्यवधी रुपयांचा निधी आणल्याचे आमदार दळवी बोलत आहेत, मग जनतेचा विकास कोठे दिसत का नाही, असा सवाल भोईर यांनी केला.
भाजपामधून हकालपट्टी करणार्या अॅड. महेश मोहिते यांनी आम्हाला गद्दारीची भाषा शिकवू नये, असे बोलताना भोईर यांची जीभ घसरली. त्यांनी आपल्या भाषणात शिव्या दिल्या. त्यामुळे त्यांचा असंस्कृतपणा उघड झाला. त्यांच्या भाषणामध्ये फक्त त्यांनी टीका केली. अलिबाग-मुरुडच्या जनतेसाठी कोणता आणि कसा विकास करणार याबाबत ते विशेष काही बोलले नाही. त्यांच्या दूरदृष्टीची कमतरता मतदारांना दिसून आली. त्यामुळे आपण अशा उमेदवारांना निवडून द्यायचे की, शेकापच्या सुज्ञ आणि सुशिक्षित उमेदवार चित्रलेखा पाटील उर्फ चिऊ ताई यांना निवडून द्यायचे अशी, चर्चा सभेच्या ठिकाणी ऐकू येत होती.
आतापर्यंत पाच निवडणुका लढलो आणि जिंकलो आहे. शिवसेना शिंदे गटाचे जिल्हा प्रमुख राजा केणी आधी निवडणूक लढवून ती जिंकून दाखवावी, असे आवाहन भोईर यांनी केले.