जनतेला उत्तर द्यावे, मतदारांची मागणी
| रसायनी | प्रतिनिधी |
गेली दोन वेळा खासदार असलेल्या श्रीरंग बारणे यांनी उरण विधानसभा हद्दीत हॉस्पिटल, मैदान, साडेबारा टक्के, जेएनपीटी खासगीकरण, कंपन्यांचे सीएसआर फंड किती दिला, नोकरभरती, सेफ्टीझोन, वालवीग्रस्त हनुमान कोळीवाडा व इतर समस्यांबाबत दहा वर्षांत काय केले याचे उत्तर उरण विधानसभेतील जनतेला द्यावे, अशी मतदारांची मागणी आहे.
दरम्यान, संजोग वाघेरेंनी पिंपरी-चिंचवड, मावळमध्ये नात्यागोत्यांचा आधार, जुन्या पक्षातील सहकार्यांची मदत घेत झंझावाती प्रचार आहे. दरम्यान, मावळ लोकसभा मतदारसंघात दोन कार्यकाळ म्हणजे दहा वर्षे श्रीरंग बारणे खासदार आहेत. या दहा वर्षात त्यांनी सहयोगी पक्ष म्हणजे भाजप यांच्या स्थानिक नेत्या, कार्यकर्त्यांना कधीही आपल्या जवळ येऊ दिले नाही, एव्हढेच नव्हे तर, ज्या शिवसेनेच्या उमेदवारीवर ते दहा वर्षे खासदार आहेत, त्या शिवसेनेला देखील आपल्या पासून लांब ठेवले, असे संपूर्ण मतदारसंघात चर्चिले जात आहे. आतापर्यंत भाजपच्या जीवावर हा माणूस खासदार झाला, पण मावळच्या भाजपा नेत्या, कार्यकर्त्यांना त्याचा काडीचाही उपयोग झाला नाही, अशी मतदारसंघातील भाजपाची भावना आहे. शिवाय मूळ शिवसेनेचे दोन भाग झाल्यावरही बारणे स्वतः शिंदेंच्या शिवसेनेत असूनही तालुकानिहाय माणसे उभी करण्याचा कोणताही प्रयत्न बारणेंनी गेल्या अडीच वर्षात केलेला नाही ही खरी परिस्थिती असल्याचे बोलले जात आहे. मग अशा व्यक्तीसाठी आम्ही स्वतःला शिणवून का घ्यावे, अशी भावनाही शिंदे गट आणि भाजपा नेत्या, कार्यकर्त्यांमध्ये आहे. दरम्यान, रायगड लोकसभा मतदारसंघाचे मतदान पार पडल्यानंतर मावळातील प्रचारात रंगत येईल. नेत्यांच्या सभांचा धडाका सुरू होईल, असे दिसते.







