सुधाकर घारेंचा थोरावेंना खोचक सवाल
। कर्जत । प्रतिनिधी ।
पूर्वी कर्जत, खालापूर हे आनंदात सुफलाम होतं. परंतु या मागच्या पाच वर्षामध्ये कर्जत, खालापूरमध्ये अन्याय, अत्याचार सुरु आहेत. दादागिरी वाढली आहे. हुकुमशाही पद्धतीने प्रशासनावर दबावशाही सुरु आहे. हे सारं गेल्या पाच वर्षात नाकर्त्या आमदाराने दाखवलं आहे, हे सर्वांना माहिती आहे, अशी घणाघाती टीका सुधाकर घारे यांनी आ. थोरवे यांच्यावर केली.
कर्जतमधील पोलीस ग्राउंड येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्यावतीने रावण दहन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश सरचिटणीस अशोक भोपतराव, रायगड जिल्हा उपाध्यक्ष एकनाथ धुळे, कर्जत तालुका अध्यक्ष भगवान चंचे, खालापूर तालुका अध्यक्ष संतोष बैलमारे, युवा जिल्हाध्यक्ष अंकित साखरे, कर्जत तालुका युवक अध्यक्ष स्वप्नील पालकर, कर्जत तालुका महिला अध्यक्षा रंजना धुळे तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते तसेच कर्जतमधील अनेक नागरिक उपस्थित होते.
यापुढे घारे यांनी सांगितले कि, कर्जत शहरात फक्त नावाला आतील रस्ते झाले आहेत. लाईटच्या व्यवस्थेकडे दुर्लक्ष केले आहे. दिवसातून पाचदा लाईट जाते. कर्जत शहरामध्ये ड्रेनेजची दुरवस्था आहे. कर्जतमध्ये जाईल तिकडे दुर्गंधी आहे. नेरळमध्ये डेंग्यूने थैमान घातले आहे. त्यासाठी आमदारांनी काय केलं? असा खोचक सवाल सुधाकर घारे यांनी आमदार महेंद्र थोरवे यांना विचारला. यावेळी आपल्या निवडणूक चिन्हाविषयी बोलतांना ते म्हणाले की, आपल्या सर्वांसमोर एक मोठा प्रश्न उभा आहे की, सुधाकर भाऊ निवडणूक कसं लढवणार? मी सांगणार आहे, माझी जनता सांगेल, माझा प्रत्येक कार्यकर्ता सांगेल, त्या माध्यमातूनच आपण निवडणूक लढवणार असल्याचं त्यांनी सांगितलं.
पदाधिकारी, कार्यकर्त्यांच्या मनातला निर्णय
कार्यक्रमात सुधाकर घारे यांनी मिश्कील अंदाजात निवडणूकी विषयी भाष्य केले. यावेळी ते म्हणाले कि, ग्राउंडवर एन्ट्री केली तर माझ्यासमोर दोन तुतारी वाजवणारे उभे राहिले. मी स्टेजवर आलो तर इथे मशाल पेटलेली दिसली. अशी मिश्कील टिप्पणी करत घारे यांनी आपल्याला निवडणूक लढण्यासाठी विविध पर्याय उपलब्ध असल्याचे संकेत दिले. तसेच नेमका निर्णय तरी काय घ्यायचाय. कारण माझ्या छातीवर घड्याळ, एन्ट्रीला तुतारी आणि स्टेजवर मशाल. पण आपल्या सर्वांना घाबरण्याचं काही कारण नाही. कारण आपले सर्व प्रमुख पदाधिकारी, माझे कार्यकर्ते माझ्यासोबत आहेत आणि तुमच्या मनात असेल तोच निर्णय आपण घेऊ, असे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
