आमचे भविष्य काय; दरडग्रस्तांची शासनाला विचारणा

| पेण | वार्ताहर |

सध्या आयते जेवायला मिळतंय म्हणून आमच्या भविष्याचा प्रश्न सुटलेला नाही, असे उद्गार पेणमधील तात्पुरत्या निवारा शेडमधील चांदेपट्टी व बारीची वाडी येथील दरडग्रस्त ग्रामस्थांनी काढले. ते अंकुर ट्रस्टच्या टीमसोबत बोलत होते. यावेळेस ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्यां डॉ. वैशाली पाटील यांनी बैठक घेऊन त्यांच्या समस्या ऐकून घेतल्या.

दरवर्षी नेहमीप्रमाणेच तात्पुरता मराठा समाज हॉल या निवारा शेडमध्ये स्थलांतरित केलेल्या महलमिऱ्या डोंगरातील ग्रामस्थांकडून गेल्या अनेक वर्षांपासून नेमके कुठे आमचे पुनर्वसन होणार आहे, किती गुंठे प्लॉट मिळणार आहे, याबद्दल काही नेमके कळत नाही म्हणून अस्वस्थता बोलून दाखवली. अचानक डोंगराला मोठी भेग पडल्याने ताबडतोब तात्पुरत्या निवारा शेडमध्ये स्थलांतरित केलेल्या बाकीच्या वाडीतील आदिवासींना तर गेल्या 17-18 वर्षांपासून पुनर्वसन न झालेल्या महलमिऱ्या डोंगरातील ग्रामस्थांकडे बघून आपल्या पुनर्वसनाची चिंता वाटत आहे. तर पेण ग्रामीणमधील तांबडी, खौसा, काजुचीवाडीतील आदिवासी ग्रामस्थांकडून शेजारीच सुरू असलेल्या खाणीमुळे आमची परिस्थिती इर्शाळवाडीतील लोकांसारखी होईल काय, या भीतीच्या सावटाखाली असल्याचे दिसून येते आहे.

या वेळेस आदिवासी ग्रामस्थांना आरोग्य व वातावरण बदल यावर संस्थेच्या कार्यकर्त्यांनी माहिती दिली. या वेळेस छाया कोकरे, सोपान निवळकर, मिनल सांडे, आशिष सावंत आणि प्रतिक्षा पोपकर उपस्थित होते. याबाबत महसूल आयुक्त यांना निवेदन देण्यात आले आहे.

आदिवासी व जंगल निवासी खरंतर निसर्गात समरस होऊन कुठलीही हानी न करता राहातात. पण, बेकायदेशीर उत्खनन, खाणी व वातावरण बदलाचा नकारात्मक परिणाम सर्वात जास्त त्यांच्यावरच होतो.

डॉ. वैशाली पाटील, सामाजिक कार्यकर्त्या
Exit mobile version