दहा वर्षात मोदींनी काय केले: शरद पवार

| सोलापूर | प्रतिनिधी |

सोलापूरच्या माढा लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीच्या सभेदरम्यान शरद पवार यांनी मोदींचा एक जुना व्हिडीओ दाखवत त्यांच्यावर टीका केली होती. त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवार यांच्यावर निशाणा साधला. मात्र, पवार यांनी फडणवीसांना चोख प्रत्युत्तर दिलं. लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत राजकीय नेत्यांच्या प्रचारसभा, बैठकांना वेग आला आहे. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचा जाहीरनामा आणि प्रचारगीत आज प्रकाशित करण्यात येणार आहे. त्यापूर्वी धाराशिवमध्ये ते पत्रकारांशी संवाद साधत होते. त्यावेळी त्यांनी भाजप, मोदी आणि फडणवीसांवर कडाडून टीका केली. आम्हाला प्रश्‍न विचारण्यापेक्षा गेल्या 10 वर्षांत तुम्ही काय केलं हे लोकांना सांगण्याची जबाबदारी तुमची आहे, माझ्याकडे जबाबदारी होती तेव्हा मी काय काम केलं हे लोकांना माहीत आहे, असं ते म्हणाले.

मोदी असोत किंवा अमित शाह अथवा इतर कोणी, त्यांच्या भाषणात सतत फक्त माझ्यावर, उद्धव ठाकरेंवर टीका असते. गेल्या 10 वर्षांपासून तुम्ही सत्तेवर आहात. त्या काळात तुम्ही काय केलंत? त्याचा लेखाजोगा आधी लोकांसमोर मांडा, उगीच मागच्या गोष्टी काढू नका, असं पवारांनी सुनावलं. त्यांच्याकडे मांडायला काही नाहीच, लोकांना सांगायला काही नाही म्हणून ते असे आरोप करत आहेत, (त्यांच्याकडे) दुसरे काही उद्योग नाहीत अशी टीकाही शरद पवार यांनी केली.

यापूर्वीही पवार यांनी भाजप सरकार आणि मोदी यांच्यावर अनेकवेळा निशाणा साधला होता. कालच सोलापूरच्या माढा लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीची सभा झाली. यावेळी शरद पवार यांनी नरेंद्र मोदी यांचा एक जुना व्हीडिओ दाखवला. शरद पवारांनी नरेंद्र मोदींचं जुनं भाषण ऐकवलं. गेले दहा वर्षे देशात भाजपकडं सत्ता आहे. मोदींच्या हातात देशाचा कारभार आहे. अनेक आश्‍वासनं दिली कि मी महागाई कमी करणार. 50 दिवसाच्या आत पेट्रोलची किंमत 5 रुपयाच्या खाली आणणार 2014 आधी पेट्रोलची किंमत 72 रुपये होती. पण आज 106 रुपये किंमत आहे. निवडणुकीआधी दिलेली आश्‍वासनं पाळली गेली नाहीत. लोकांची फसवणूक सुरु आहे, असं शरद पवार म्हणाले.

Exit mobile version