तुम्हा लेकरांना मी काय आशीर्वाद देऊ?

| गुरुनाथ साठेलकर |
श्रीमती सिंधुताई सकपाळ उर्फ माईंची आणि आमची झालेली भेट ही खरोखरच अविस्मरणीय अशीच होती. तुम्हां लेकरांना मी काय आशीर्वाद देऊ? तुम्ही तर माईच्या मदतीसाठी साठी धावून आलात रे…अशाच काहीशा शब्दात माईंनी आमच्या संस्थेला दिलेला आशीर्वाद अजूनही आम्हा सर्वांच्या मनातल्या सुवर्ण कोषात बंद आहे. अनाथांची माय असलेल्या माई निवर्तल्या असा काळीज पिळवटून टाकणारा दुःखद निरोप मिळताच, आमच्या आयुष्यातील अविस्मरणीय असा तो सुवर्णक्षण मला स्पष्ट आठवला.


23 डिसेंबर 2017 रोजी मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवे पुण्याकडे जाणार्‍या दिशेने ख्रिसमस, विकेंड आणि ईयर इंडच्या पाश्‍वर्र्भूमीवर भरभरून वाहत असताना खूप वेळ हजारो वाहनाच्या गर्दीत ट्रॅफिक जाममध्ये खोळंबला होता. मुंगी शिरायला ही जागा नाही अशीच जणू काही परिस्थिती होती. योगायोगाने आम्ही काही टीम मेंबर बोरघाट पोलीस यंत्रणेच्या सोबत ट्रॅफिक क्लियर करण्याच्या मोहिमेत लागलो होतो. त्याच वेळी रात्री दहा वाजताच्या दरम्यान आमच्या टीमचे मार्गदर्शक तथा तत्कालीन आमदार सुरेश लाड यांचा मला फोन आला. त्यांनी सांगितलं की, अनाथांची माय अर्थात सिंधुताई सपकाळ यांची मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर पुण्याकडे जात असताना घाटात गाडी बंद पडलेली आहे, त्यांची तब्येत ठीक नसल्याने त्यांना खूप त्रास होत आहे. त्यांची गाडी शोधून मदत कराच, त्यांच्यासाठी पर्यायी कारचा बंदोबस्त देखील करा आणि त्यांना काय हवं नको ते देखील पहा. हा निरोप नव्हे तर त्यांचा आमच्यासाठी आदेश होता. आपलं आयुष्य समाजासाठी वाहून घेतलेल्या माईंची मदत करण्यासाठी सुरेशभाऊंनी दिलेला आदेश जाणून घेत अपघाताच्या ग्रुपवर तशा आशयाचा मेसेज दिला.


अनाथांची माय म्हणून नावलौकिक प्राप्त केलेल्या त्या माऊलीला मदत करण्यासाठी आमचे जवळपास वीसएक टीम मेंबर सरसावले. तोवर माईंच्या कार चालकाने सांगितलेल्या खुणांच्या अंदाजानुसार आम्ही शोधकार्य सुरु केले. त्याने सांगितले की खालापूर टोलनाक्या नंतरच्या फूडमॉल पासून काही अंतरावर आम्हाला ट्रॅफिक जामचा सामना करावा लागला असून, त्यांची गाडी अशा ठिकाणी बंद पडली आहे की, त्यांना लोकेशनचा काहीच अंदाज येत नाहीये, किंबहुना त्यांच्या गाडीचा दरवाजाही उघडून बाहेर पडता येत नाहीये अशा स्वरूपात गाड्या एकमेकाला चिकटून उभ्या आहेत. मात्र त्याने गाडीचा रंग आणि नंबर आम्हाला दिला. एवढ्याशा संदर्भावर वाहनांच्या तोबा गर्दीत माईंची गाडी शोधणे म्हणजे वाळूमध्ये सुई शोधण्याचा प्रकार होता. ते आमच्यासाठी चॅलेंज होते.


त्यावेळी आम्ही काही मेंबर ट्राफिक जाममध्ये अमृतांजन ब्रिजजवळ मदत करत होतो, त्यामुळे तेथून खालापूरकडे विरुद्ध दिशेने आम्ही वाहनांच्या गर्दीतून चालतच वाट काढत निघालो. खोपोलीतून जे मेंबर मदतीला येणार होते त्यांनाही घाटाच्या दिशेने किलोमीटर 39 च्या दरम्यान आपापल्या गाड्या पार्क करून चालतच शोधकार्य सुरू करण्यास सांगितले. त्याच सोबत पर्यायी कारची व्यवस्था करून मुंबईच्या दिशेने ती कार सज्ज ठेवली. किलोमीटर 39 ते 45 या दरम्यान आमचे डोळे फक्त माईंच्या कारला शोधत होते. वेळ पुढे पुढे सरकत होती. कधी माईंचा तर कधी त्या कार चालकाचा फोन आम्हाला येत होता. त्यातून, माईंच्या मनावर प्रचंड ताण आलेला जाणवत होता आणि चालकही गोंधळलेल्या अवस्थेत होता. त्या दरम्यान सुरेश लाड यांचे फोनवर फॉलोअप घेणे सुरू होते. साधारण तासभराच्या शोधानंतर आम्ही कसेबसे माईंच्या कारपर्यंत पोचलो. अनपेक्षितपणे आम्हाला त्यांच्या मदतीला आलेले पाहून, त्यांना झालेला आनंद अवर्णनीय होता. समयसूचकता बाळगत माईंना तहान-भूक लागल्याची शक्यता गृहीत धरून नाश्ता पाण्याची सोय देखील आम्ही केली होती. आमची सगळी तयारी पाहून माई अक्षरशः गहिवरून गेल्या. भरलेल्या डोळ्यांनी त्यावेळी त्यांनी प्रत्येकाच्या डोक्यावर हात फिरवत दिलेल्या आशीर्वादाचा स्पर्श आम्हाला कृतार्थ करत होता. तुम्हां लेकरांना मी काय आशीर्वाद देऊ? तुम्ही माझी लेकरं, माईसाठी एवढ्या कातर रात्री कशी धावून आलात रे, मला तर वाटलं होतं की, या वाहतूक कोंडीतच माझ्या जिवाचं काहीतरी बरं वाईट होईल… असेच भाव व्यक्त करणारे, माईंचे शब्द होते.


कित्येक तास वाहतूक कोंडीत खोळंबल्याने थकलेल्या माईंच्या चेहर्‍यावरचा ताण कमी झाला होता. माईंसाठी नाश्ता आणि पाणी आणले होते. त्या रात्री, खोळंबलेल्या महामार्गावर माईंनी त्यांच्यासाठी आणलेले पदार्थ स्वतःच्या हाताने आम्हालाही खायला दिले. आम्ही पर्यायी वाहनाचा बंदोबस्त करून माईंना वाहतूक कोंडीतून वेगळ्या मार्गाने पुण्याकडे सुखरूप रवाना केले. आमच्या हातून एक अनोखेसेवा कार्य पार पडले होते. ती घटना विसरता येणं शक्यच नाही. आम्ही मदतीला आलेले पाहून त्यांनी आमच्या डोक्यावर मायेने फिरवलेल्या हातातली थरथर अजूनही तशीच्या तशी जाणवते. त्यांच्यासाठी आणलेल्या पदार्थातून आम्हाला दिलेला वाटा, म्हणजे जणू काही त्यांनी स्व:हाताने आमच्या तोंडी घास भरविल्याची ती अनुभूती होती. आज माई इहलोकांची यात्रा संपवून देवाघरी गेल्या असतील. मात्र लाखोंच्या मनातल्या माईंना नियती कधीच हिरावूच शकत नाही. त्या अजरामर आहेत. आजवर अनेक अपघातात मदत केली, मात्र अनाथांची आई म्हणून गणल्या जाणार्‍या माईंची सेवा करण्याचे परमभाग्य आम्हाला लाभले हे आमचे पूर्वाश्रमीचे संचित. त्या क्रूर नियतीला आम्ही स्पष्टपणे सांगावेसे वाटते की, आमच्या मातृतुल्य माई अजूनही आमच्यासोबतच आहेत आणि राहतील. माईंच्या या आठवणी नेहमीच स्फूर्ती देत राहतील.

Exit mobile version