। पोलादपूर । वार्ताहर ।
पोलादपूर तालुक्यातील सर्वात प्रवाही राजकारण चालणार्या लोहारे तुर्भे पुलापलीकडच्या तुर्भे दिवील पंचक्रोशीतील वझरवाडी, तुर्भे बुद्रुक, तुर्भे खोंडा आणि तुर्भे खुर्द या चार ग्रामपंचायतींच्या निवडणुका कोणत्याहीक्षणी घोषित होण्याची शक्यता आहे. गेल्या दीड वर्षांपासून कोरोना काळामध्ये प्रशासक असलेल्या या ग्रामपंचायतीमध्ये गेल्या काही वर्षांमध्ये प्रचंड राजकीय उलथापालथ झालेली दिसून आली. पोलादपूर तालुक्यातील तब्बल 16 ग्रामपंचायतींचा कार्यकाळ आगामी काळात संपुष्टात येणार असताना या मुदत संपलेल्या चार ग्रामपंचायतींच्या निवडणुका तालुक्याला कोणता संदेश देणार, याबाबत उत्कंठा वाढली आहे.
ब्रिटीशकाळापासून तुर्भे खुर्द हे अस्तित्वात असून सध्या कलमवाडी येथे असलेल्या स्मृतीस्तंभावर 1914-1919 दरम्यान तुर्भे खुर्द गावातील 83 पुरूष महायुध्दासाठी रवाना झाले. यापैकी 7 जणांनी प्राणांची बाजी लावली असा मजकूर दिसून येत आहे. युती सरकारच्या काळात 1996च्या दरम्यान महाडचे तत्कालीन नगराध्यक्ष स्व.अण्णा सावंत यांच्या आग्रहावरून माजी ग्रामविकास मंत्री स्व.प्रभाकर मोरे यांनी तुर्भे खुर्द या ग्रुपग्रामपंचायतीचे त्रिभाजन केल्यानंतर तुर्भे खुर्दसह तुर्भे बदु्रुक, तुर्भे खोंडा आणि वझरवाडी अशा चार ग्रामपंचायतींची निर्मिती झाली होती. याखेरीज, सध्याची तुर्भे खोंडा ही ग्रामपंचायत सर्वात आत सह्याद्री पर्वतरांगांच्या पायथ्याशी वसलेली असून या चारही ग्रामपंचायतींमधील राजकारण प्रवाही आणि प्रभावी ठरत असते. खोत-पाहुणे तसेच भावकी-गावकी अशा प्रभावांचे राजकीय स्वरूप असून अनेक ग्रामस्थांच्या राजकीय प्रवेशांच्या सातत्यामुळे हा भाग नक्की कोणाकडे किती याचा अंदाज लावणे कठीण असते.
मागील पंचवार्षिक निवडणुकीमध्ये या चार ग्रामपंचायतींनी शिवसेनेचा भगवा फडकविताना तुर्भे खोंडा सुनिता वृंदावन खेडेकर, तुर्भे खुर्दमध्ये वासंती भावेकर, तुर्भे बुद्रुकमध्ये साक्षी मंगेश उतेकर आणि वझरवाडीमध्ये वर्षा भागोजी जाधव या चार महिलांना सरपंचपदाचा मान दिला होता. कोरोना काळामध्ये या ग्रामपंचायतींमध्ये प्रशासक म्हणून हंबीर, सुरवसे, फड, विकास शिंदे हे चार शासननियुक्त प्रतिनिधी सरपंचांचे कामकाज पाहात होते. या चारही ग्रामपंचायतीमध्ये 14 व्या आणि 15 व्या वित्तआयोगाची विविध विकास कामे झाली असून अलिकडेच मतदार याद्यांची प्रारूपनिश्चितीदेखील सुरू करण्यात आली आहे. गेल्या निवडणुकीवेळी श्रीराम विकास आघाडी आणि भारतीय जनता पक्षाने लढविलेल्या जागांपैकी तुर्भे खुर्दमध्ये श्रीराम विकास आघाडीला 2 तर वझरवाडीमध्ये भाजपला 1 जागा मिळाल्याची चर्चा झाली.
अलिकडेच रायगड जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक एकनाथ गायकवाड आणि अॅड. आस्वाद पाटील यांच्या माध्यमातून शेकापक्षानेही याठिकाणी विकासकामांची सुरूवात केली असल्याने मतदारांना अधिक पर्याय खुले झालेले दिसून येत आहेत. पोलादपूर तालुक्यातील पहिल्या टप्प्यातील या निवडणुकांसाठी शिवसेना आणि शेकापक्षाने मोर्चेबांधणी केल्याचे दिसून येत आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची पारंपरिक मते असून राजकीय युती-आघाडी होण्याची शक्यताही याठिकाणी दिसून येत आहे.