एकशेसदतीस वर्षे वयाच्या पक्षाला ऐंशी वर्षांचा अध्यक्ष मिळाला आहे. काँग्रेसमध्ये चोवीस वर्षांनंतर गांधी घराण्याच्या बाहेरचे असलेले मल्लिकार्जुन खर्गे अध्यक्ष होणार आहेत. आपल्या देशातील कोणत्याही राजकीय पक्षामध्ये खर्या अर्थाने संघटनात्मक निवडणुका होत नाहीत. गल्लीपासून ते दिल्लीपर्यंत सर्व निवडी व नियुक्त्या या ठराविक नेतेमंडळी करीत असतात. जगातील सर्वात मोठा पक्ष असल्याचा दावा करणार्या भारतीय जनता पक्षासाठी तर ‘एकाने बोलायचे आणि बाकीच्याने ऐकायचे’ हे प्राणतत्वच आहे. त्याची मातृसंघटना असलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला एकचालकानुवर्तीत्वाचा मोठा अभिमान आहे. त्यामुळे नरेंद्र मोदी व अमित शाह यांनी जे.पी. नड्डा यांची निवड जाहीर करणं किंवा त्यांना मुदतवाढ देणं यात कोणालाच काही गैर वाटत नाही. गंमत म्हणजे हेच भाजपवाले काँग्रेस, तृणमूल, शिवसेना किंवा कम्युनिस्ट पक्षात लोकशाही नसल्याबद्दल टीका करायला पुढे असतात. आतादेखील काँग्रेसच्या निवडणूक अधिक गाजवली ती भाजपच्या प्रवक्त्यांनी. रोज उठून काही ना काही टीकेचा मुद्दा ते शोधत होते. पण काहीही असले तरी काँग्रेसमध्ये खालपासून वरपर्यंतच्या कार्यकर्त्यांनी मतदान करून एक अध्यक्ष निवडला आहे ही महत्वाची व स्वागतार्ह बाब आहे. काँग्रेसने खरे तर आता या मुद्द्यावरून भाजपला घेरायला हवे. या निवडणुकीत खर्गे यांना सुमारे आठ हजार तर त्यांचे प्रतिस्पर्धी शशी थरूर यांना एक हजार मते मिळाली. खर्गे यांना गांधी कुटुंबाचा पाठिंबा आहे ही बाब लपून राहिलेली नव्हती. त्यामुळेच त्यांच्या अर्जाला अनुमोदन देण्यासाठी पक्षाचे झाडून सारे ज्येष्ठ नेते हजर होते. राज्याराज्यांमध्ये प्रचारासाठी गेले असता तिथल्या प्रदेशाध्यक्षांनी देखील थरूर यांची भेट घेण्याचे टाळले होते. तरीही थरूर यांना मिळालेली मते दुर्लक्षणीय नाहीत. याचा अर्थ गांधी घराण्याच्या कक्षेच्या बाहेर जाऊन पण काँग्रेससाठीच विचार करणारा एक मोठा गट पक्षात अजूनही मौजूद आहे. या गटाचे अस्तित्व जी-23 नेत्यांच्या रुपाने दिसले होते. राहुल गांधी जर जबाबदारी घ्यायला तयार नसतील तर पक्षाला एक वेगळा पूर्णवेळ अध्यक्ष आवश्यक आहे ही त्या नेत्यांची मागणी होती. शशी थरूर हे त्या बंडखोर गटामध्ये होते. त्यांचे दुसरे सहकारी कपिल सिब्बल आणि गुलाम नबी आझाद हे पक्ष सोडून गेले. बाकीचे अजून मागे आहेत. यापैकी किती जण खर्गे यांच्या मागे मनापासून उभे राहतील हा प्रश्न आहे. दुसरीकडे खर्गे यांच्याही आधी गांधी कुटुंबाची पहिली पसंती अशोक गेहलोत यांना होती. पण त्यांना राजस्थानचे मुख्यमंत्रिपद कायम ठेवून अध्यक्षपद घ्यायचे होते. राहुल गांधी यांनी मोडता घातल्याने तो प्रकार टळला. पण गहलोत हे स्वस्थ बसतील असे नव्हे. त्यांचे विरोधक सचिन पायलट यांचे मुख्यमंत्रिपद पुन्हा एकवार हुकल्याने तेही नाराज आहेत. याखेरीज प्रत्येक राज्यामध्ये काँग्रेसमध्ये किमान दोन तरी गट आहेत. ज्या राज्यात काहीही ताकद उरलेली नाही तिथले नेतेही पक्ष अधिक खड्ड्यात कसा जाईल या दिशेनेच काम करीत आहेत. महाराष्ट्र हे त्याचे उत्तम उदाहरण आहे. गेल्या आठवड्यात अंधेरी पूर्व निवडणुकीवरून सर्व पक्ष भाजपच्या विरोधात आणि उद्धव यांच्या बाजूने उभे राहिलेले असताना मुंबईत मिलिंद देवरा, वर्षा गायकवाड या नेत्यांनी एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन चर्चा केली. पालिका निवडणुकीत ते पक्षादेश झुगारणार हे स्पष्ट आहे. या स्थितीत खर्गे हे पक्षाला नवी दिशा देण्याची शक्यता शून्य आहे. पण, इतर पक्षांना सोबत घेऊन भाजपविरोधात एक राजकीय आघाडी करण्यासाठी गांधी कुटुंबिय व इतरांना ते राजी करू शकले तरीही ती मोठी उपलब्धी होईल. अहमद पटेल, प्रणब मुखर्जी इत्यादींच्या जाण्यानंतर पक्षात फारसे राजकीय धुरंधर उरलेले नाहीत वा आहेत त्यांना किंमत उरलेली नाही. खर्गे यांनी असे नेते पुन्हा एकत्र आणले तर पक्षाला उपयोग होईल. अंतिमतः, सर्व सत्ता गांधींकडेच असणार आहे. पण पक्ष टिकला तरच या सत्तेला अर्थ आहे. ते त्यांना समजावणे हेच खर्गे यांचे मुख्य काम असेल.
खर्गे काय करणार?

- Categories: संपादकीय, संपादकीय
- Tags: alibagEditorialmarathi newsmarathi newspaperraigad
Related Content
रायगड जिल्ह्याचा ‘एनसीसी मॅन’ हरपला; शेकाप नेते जयंत पाटील यांनी व्यक्त केल्या भावना
by
Antara Parange
June 6, 2026
अग्निशमन दलातील पहिले शहीद बाळू देशमुख आणि वीरपत्नी अलका देशमुख यांची प्रेरणादायी कहाणी
by
Sanika Mhatre
March 8, 2026
सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रातील: संगिता ढेरे
by
Sanika Mhatre
March 8, 2026
स्वर, संस्कार आणि स्वावलंबनाचा प्रवास: पूनम पाटेकर
by
Sanika Mhatre
March 8, 2026
शिक्षण क्षेत्रातील आदर्श व्यक्तिमत्व: ज्योती पाटील
by
Sanika Mhatre
March 8, 2026
यशस्वी व्यावसायिका: रोशनी गुरव
by
Sanika Mhatre
March 8, 2026