। नवी दिल्ली । वृत्तसंस्था ।
रशिया आणि युक्रेनमध्ये युद्ध सुरू आहे. या युद्धाचा मोठा प्रभाव हा आंतरराष्ट्रीय बाजारपेठेवर पडला आहे. कच्च्या तेलासह सर्वच वस्तू महागल्या आहेत. सोन्याच्या भावाने तर गेल्या 14 महिन्यातील उच्चांक गाठला आहे. वाढत असलेल्या महागाईत आता आणखी एका गोष्टीची भर पडली आहे, ती म्हणजे गव्हाची. गेल्या 15 दिवसांमध्ये गव्हाचे दर क्विंटलमागे 85 ते 90 रुपयांनी वाढले आहेत. सध्या गव्हाच्या काढणीचा हंगाम आहे. सर्वसाधारणपणे जेव्हा बाजारात नवे पीक येते तेव्हा दर स्वस्त होतात. मात्र आता गव्हाचे भाव वाढले आहेत. येणाऱ्या काळात गव्हाचे भाव आणखी वाढतील अशी अपेक्षा शेतकऱ्यांना आहे. त्यामुळे सध्या तरी शेतकरी नवा गहू बाजारात आणताना दिसून येत नाहीयेत. सध्या मार्केटमध्ये गव्हाच्या पुरवठ्यापेक्षा मागणी वाढल्याने गव्हाचे दर वधारले आहेत.
भारताला गहू निर्यातीची संधी
भारत हा जगातील गहू उत्पादक देशांपैकी एक प्रमुख देश आहे. सध्याच्या स्थितीमध्ये भारताकडे पर्याप्त प्रमाणात गव्हाचा साठा देखील उपलब्ध आहे. प्राप्त आकडेवारीनुसार एक फेब्रुवारीपर्यंत भारताकडे गव्हाचा 2.82 कोटी टन साठा शिल्लक आहे. याशिवाय शेतकऱ्यांकडे देखील मागच्या वर्षीचा गहू शिल्लक आहे. यंदा भारतात 10.5 कोटी टन गव्हाचे उत्पादन होण्याचा अंदाज आहे. म्हणजेच काय तर देशाची गरज पूर्ण होऊन देखील यंदा गव्हाचा मोठा साठा शिल्लक राहणार आहे. रशिया आणि युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर यंदा भारतातून गव्हाची निर्यात वाढू शकतो. दरवर्षी 50 लाख टनाच्या आसपास भारतातून गहू निर्यात केले जातात. मात्र यंदा त्यामध्ये वाढ होऊन निर्यात 70 लाखांच्या आसपास जाण्याची शक्यता आहे.