न्हावा शेवा पोलिसांचे दुर्लक्ष
| उरण | वार्ताहर |
न्हावा शेवा पोलीस ठाणे परिसर अवैध धंद्याचे केंद्रबिंदू म्हणून ओळखू लागले असून, जसखार गावात सध्या नाईट क्रिकेट मॅचमध्ये मोठ्या प्रमाणात चक्री जुगार खुलेआम सुरू असल्याची चर्चा जोरात आहे. न्हावा शेवा पोलीस ठाण्याचे अधिकारी हे जाणूनबुजून दुर्लक्ष करत असल्याने नवी मुंबईचे पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांनी जातीने लक्ष केंद्रित करावे. तसेच संबंधित अवैध धंद्यांवर कारवाईचा बडगा उगारावा, अशी मागणी महिला वर्ग करत आहेत.
न्हावा शेवा पोलीस ठाण्याच्या हद्दीत देश-परदेशात मालाची आयात-निर्यात करणारे देशातील पहिल्या नंबरचे महत्त्वाचे जेएनपीए बंदर परिसर येत आहे. त्यामुळे या बंदरातून मोठ्या प्रमाणात अमली पदार्थांची तस्करी होत असल्याचे कारवाईच्या माध्यमातून निदर्शनास आले आहे. त्यामुळे जसखार ग्रामपंचायत हद्दीतील हा परिसर अवैध धंद्याचे केंद्रबिंदू म्हणून देखील ओळखू लागला आहे. अशा जसखार ग्रामपंचायत हद्दीत सध्या शुक्रवार (दि.13) ते रविवार (दि.15) पर्यंत नाईट क्रिकेट मॅचचे आयोजन करण्यात आले आहे. अशा क्रिकेट मॅचमध्ये अवैध दारु, चक्री नावाचा जुगार खुलेआम खेळला जात आहे.
त्यामुळे क्रिकेट बघण्यासाठी, रात्रीच्या अंधारात दारु पिण्यासाठी व चक्री जुगार खेळण्यासाठी तरुणांनी आपला मोर्चा जसखार गावात वळविला असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. एकंदरीत अशा अवैध धंद्यामुळे अनेक कुटुंबांत कलह निर्माण होत असल्याने अशा अवैध धंद्यावर, जुगारावर नवी मुंबई पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांनी कारवाईचा बडगा उगारावा, अशी मागणी चक्क महिला भगिनी करत आहेत.