मुलांच्या सुट्टीनिमित्त गावागावात दाखल; धार्मिक कार्यक्रमांची रेलचेल
| तळा । वार्ताहर |
तळा तालुका ह्या निसर्ग व सुंदर डोंगर रांगानी नटलेल्या तालुक्याला ऐतिहासिक तळगड, कुडे लेणी तसेच समुद्र किनाराही लाभलेला आहे. येथे अनेक जाती धर्माचे लोक एकतेने राहत असून आनंदाने सर्व सण उत्सव साजरे करत असतात. आता लग्नांचा हंगाम व मुलांना सुट्ट्या असल्याने तालुक्यात चाकरमान्यांची वर्दळ दिसू लागली आहे.
या डोंगरी तालुक्यात उत्पन्नाचे साधन अथवा नोकरी करण्याकरीता कोणतेही कारखाने उद्योगधंदे नसल्याने येथील गावागावांतील नागरिक आपली उपजीवीका कशीबशी भागवत आहेत. आर्थिक समस्यांना तोंड देणे व महागाईशी सामना करत असताना येथील गावांसाठी मुंबई शहर हे जवळ असल्याने मिळेल ती नोकरी करण्यासाठी येथील तरूण वर्ग मुंबई, नालासोपारा, ठाणे, दिवा विभागात मोठ्या प्रमाणात स्थलांतरीत झाला आहे.
नोकरी व्यवसाय करून आपले कुटुंब तेथेच घेऊन जातात. त्यामुळे गावागावात अनेक घरे बंद झाली आहेत. मुलांना शाळांना सुट्टी पडली की सगळे चाकरमानी गावाकडे मार्गस्थ होतात आणि मे महिना पूर्ण भरगच्च होऊन आनंदाचे व उत्साहाचे भरते येते. या कालावधीत गावपातळीवर मंडळांच्या व गावच्या सत्यनारायणाच्या महापूजा असतात. या पूजा म्हणजे गावच्या विकासाला चालना असते. अशा या पूजेच्या निमित्ताने ग्रामीण व डोंगराळ भाग असल्याने या भागाच्या दृष्टीने बचत गट, महिलामंडळ यांचे माध्यमातून एखादा व्यवसाय निर्माण करून चांगल्या प्रकारे गावपातळीवर उद्योग करता येतील असे निर्णय घेतले पाहीजेत.
तालुक्यात वावेहवेली धरणाच्या पाण्याच्या ओलाव्यावर वावेहवेली. बामणघर, खैराट, राणेचीवाडी वानस्ते येथिल अनेक तरूण शेतकरीवर्ग कारली, कलिंगड, चवळी, मिरची, वांगी, पालेभाज्या, आदी पिके मोठया प्रमाणात काढत असून चांगल्या प्रकारे त्यातून आर्थिक लाभ होत असल्याचे पहावयास मिळत आहे. अशी ही उत्पनाची स्त्रोत तरूण वर्गाने लक्ष घालून करण्याचा प्रयत्न केला तर मुंबईकडे वळण्याची गरज भासणार नाही. त्याच बरोबर अपूर्ण असणारे बारपे धरणाचे काम पूर्ण झाले तर महागांव, पढवण, कोणथरे भागात उन्हाळी भातशेती व भाजीपाला पिकविता येईल व वांजलोशी धरणाचेही पाणी शेतीसाठी सोडले तर तळेगाव विभागातही शेती भाजीपाल्याचे पिक काढता येईल. अशा धरणांच्या पाण्याचा शेतकर्यांना लाभ होऊ शकतो. त्याच बरोबर तालुक्यात एखादा मोठा कारखाना किंवा उद्योग अथवा एमआयडीसी झाली तर मुंबईकडे वळत असणाच्या तरूण वर्गाला स्थानिक पातळीवर काम मिळून आपल्या गावात राहून गाव पूर्वी सारखे भरलेलं राहून मुंबईचे स्थलांतर कमी होईल.