| सोलापूर | प्रतिनिधी |
काँग्रेस उमेदवार प्रणिती शिंदे यांच्या प्रचारासाठी राहुल गांधी सोलापूरमध्ये आले होते. या सभेत राहुल गांधींनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांच्या सरकारवर टीका केली, तसंच आमचं सरकार आल्यावर महालक्ष्मी योजना आणणार असल्याची घोषणाही राहुल गांधींनी केली आहे. देशात पहिल्यांदाच संविधान संपवण्याचा घाट एक पार्टी घालत आहे. त्यांचं लक्ष निवडणूक जिंकण्याचं नाही तर संविधान बदलण्याचं आहे आणि आमचं त्याला वाचवण्याचं आहे. सगळ्यांना संविधानामुळे न्याय मिळाला आहे. संविधान नष्ट झालं तर गरीब, शेतकरी, मजूर यांना काहीच मिळणार नाही. भाजप नेते सांगत आहेत, ‘आम्ही निवडणूक जिंकली तर संविधान बदलू, पण संविधान बदलणारी ताकद अद्याप देशात नाही’, असं राहुल गांधी म्हणाले आहेत.
‘मोदींनी 22 श्रीमंतांची 16 लाख कोटींची कर्जमाफी केली. मनरेगाला एवढे पैसे 24 वर्ष लागतात. यातून 24 वेळा कर्जमाफी झाली असती. जेवढा पैसा 22 लोकांकडे आहे, तितकाच पैसा 70 कोटी भारतीयांकडे आहे. 40 टक्के पैसा एक टक्के लोकांकडे आहे, त्यामुळे महागाई वाढत आहे. नोटबंदीचा फायदा 22 उद्योजकांना झाला,’ असा आरोप राहुल गांधींनी केला आहे. ‘मोदींनी 20-25 अरबपती बनवले, आम्ही करोडो लखपती बनवणार आहे. भारताच्या महिला डबल काम करत आहेत, बाहेर आठ तास, घरात आठ तास काम करतात. घरकामाचे महिलांना पैसे मिळत नाहीत. महिलांसाठी आम्ही महालक्ष्मी योजना आणणार आहोत. सगळ्या गरीब कष्टकरी लोकांची यादी आम्ही करणार, त्यातून एक महिला निवडणार. महिलांना काँग्रेस वर्षाला एक लाख रुपये देणार. महिलांना पैसे मिळाल्यास पुरुषांनाही फायदा होणार’, असं आश्वासन राहुल गांधींनी दिलं.
‘नरेंद्र मोदींनी बेरोजगारी वाढवली, उद्योगपतींची मुलं अप्रंटिस करतात, मात्र हा लाभ गरीब मुलांना मिळत नाही, त्यामुळे आम्ही अप्रंटिस योजना आणणार आहे. काम मागणार्यांना पहिल्या वर्षात नोकरीची हमी देणार. करोडो युवकांना एक वर्षाचं प्रशिक्षण देणार, या काळात एक लाख रुपयेही देणार. प्रत्येक पदवीधरला हा लाभ देण्यात येईल’, असं राहुल गांधी म्हणाले. ‘शेतकर्यांनी मोदींकडे कर्जमाफी आणि आधारभूत किंमत मागितली, पण घाम गाळणार्या शेतकर्यांना लाभ मिळत नाही. शेतकर्यांचं कर्ज आम्ही माफ करणार. ही सुरूवात आहे. शेतकर्यांसाठी एक कमिशन निर्माण करणार, ज्या वेळी शेतकर्यांना कर्जमाफी हवी आहे, त्यावेळी ही कर्जमाफी दिली जाईल. कितीही वेळा मागितली तरी कर्जमाफी देऊ. शेतीमालाला आधारभूत किंमत देणार,’ असं आश्वासन राहुल गांधींनी शेतकर्यांना दिलं आहे.