सत्तेचा उन्माद चिखलात लोळतो तेव्हा…

जगद्गुरु तुकाराम महाराजांनी अशा प्रवृत्तींना फटकारले; समाज सुधारण्यासाठी कुचर दाणेे फेकून द्यावेत

| खास प्रतिनिधी | रायगड |

जगातील समाजामध्ये व्यक्तींच्या अनेक प्रवृत्ती आढळतात. काही व्यक्ती अतिशय संवेदनशील असतात, तर काही निव्वळ बधीर असतात. काही व्यक्तींचा सद्सद्विवेक सदैव जिवंत असतो, तर काही लोकांना विवेक म्हणजे काय तेच कळत नाही. त्यांच्याकडे असलेल्या सत्तेचा त्यांना इतका उन्माद असतो की आपण काय करतो, कोणाविषयी बोलतो, कोणावर टीका करतो आणि ती कशा प्रकारे करतो, याचे भानच ते हरपून बसतात. काहीच दिवसांपूर्वी रायगड जिल्ह्यात असाच सत्तेचा उन्माद चिखलात लोळताना अवघ्या समाजाने पाहिला आहे. स्वयंपाक करताना आपली आई धान्यातील कुचर दाणे (खडे) जसे निवडून फेकून देते, तसेच समाजानेही असे कुचर दाणे वेचून बाहेर काढले पाहिजेत. यातच समाजाचे भले आहे, असे जगद्गुरू तुकाराम महाराज आपल्याला अभंगातून सांगतात.
काय नाहीं लवत झाडें ।
विसरे वेडें देहभाव ॥1॥
जया न फळे उपदेश ।
धस ऐसा त्या नांवें ॥धृ॥
काय नाहीं असत जड ।
दगड तो अबोलणा ॥2॥
तुका म्हणे कुचर दाणा ।
तैसा म्हणा डेंग हा ॥3॥
झाडं लवत नाहीत का? वेडा देहभान विसरत नाही का? ज्याच्यावर उपदेशाचा काहीही परिणाम होत नाही, तो दगडच नाही का? दगड काही बोलत नाही, तो जड असतो, तशी एखादी व्यक्ती ही जडबुद्धीची असते. तुकाराम महाराज म्हणतात, जसा कुचर दाणा असतो, तसा हा डेंग असतो.

काही ओल्या मातीच्या गोळ्याप्रमाणे असतात ज्यांना चटकन आकार देता येतो, तर काही दगडासारखे टणक असतात. त्यांच्यावर घागरीने पाणी ओतलं तरी आणि घणाचे घाव घातले तरी, त्यांना काहीही फरक पडत नाही. ते आतून कोरडेच आणि टणक राहतात. काही माणसं नम्र असतात, तर काही अतिशय ताठर असतात. ते कोणाहीपुढे नम्र होत नाहीत. तुकाराम महाराज अशाच लोकांना उद्देशून विचारतात की, झाडं लवत नाहीत का? वेड्याच्याही मनात आनंदतरंग उठतात आणि तोही देहभान विसरतो, पण दगडासारखी जी माणसं असतात, त्यांच्यावर मात्र कसलाही परिणाम होत नाही.

समाजातले भेदाभेद, उच्च-नीचता, द्वेष, हिंसा, सत्तेचा उन्माद याच्या विरोधात थोर व्यक्ती हजारो वर्षांपासून प्रबोधन करत आल्या आहेत. काम, क्रोध, मोह, लोभ, मद, मत्सर या षड्विकारांच्या प्रवृत्तींनी समाजात अनेकदा थैमान घालून समाजाचे फार मोठे नुकसान केले आहे. म्हणून संतांनी प्रबोधन करुन या षड्विकारांपासून मुक्ती मिळवण्यासाठी उपदेश केला आहे. पण, माणसाच्या मनातला अहंकार, आढ्यतेखोरपणा इतका की असतो अशी प्रवृत्ती काहीच ऐकायला तयार नसतात. शतकानुशतकांच्या अनुभवातूनही काहीच शिकत नाहीत. गुलामगिरी माणसाचं माणूसपण हिरावून घेते, हे त्यांना कधीच कळत नाही. कारण, अशी व्यक्ती त्यांना मिळालेले सुख, वैभव, पैसा यामध्ये एवढे मशगुल झालेले असतात की, अशा व्यक्तीची अवस्था पाळीव प्राण्यांपेक्षाही जास्त वाईट असते. माणसं पाळीव प्राण्यावरही प्रेम करतात, त्यांचे लाड करतात. पण, गुलामाच्या वाट्याला फक्त तिरस्कार आणि अवहेलनाच येते. तरीही काही मन मेलेल्या, विचारशक्ती कुंठित झालेल्या, सत्व नष्ट झालेल्या माणसांना गुलामगिरीची चीड येत नाही. राग येत नाही. त्यांना उलट स्वातंत्र्याची भीती वाटत राहते. गुलामी त्यांच्या इतकी अंगवळणी पडून जाते की, गुलामीतून मुक्त होण्याचा त्यांना अवसर मिळाला तरी ते त्या संधीकडे सपशेल पाठ फिरवून आपल्या हातापायातल्या, गळ्यातल्या आणि मनातल्या साखळ्या घट्ट धरुन बसतात. ऐकले तर आपलेच भले होणार आहे. नाही ऐकले तरी वाटोळेही आपलेच होणार. तेव्हा ऐकायचे की नाही ते ज्याचे त्यांनी ठरवण्याची आता वेळ आली आहे.

वाघाला एखाद वेळेला शिकार मिळाली नाही तर तो शिकार करण्याचे विसरत नाही. शिकार करताना तो दोन पावले मागे येतो, याचा अर्थ तो हरला म्हणून मागे सरकत नाही, तर शिकारीवर झेप घेण्यासाठी तो मागे आलेला असतो. हे शिकार होणार्‍याला शिकार झाल्यावर कळते.
Exit mobile version