आपटा ग्रामपंचायतीचे दुर्लक्ष, नागरिकांमध्ये संताप
| आपटा | वार्ताहर |
पावसाळा तोंडावर आलेला असताना आपटा ग्रामपंचायत हद्दीतील कामांना अद्याप मुहूर्त मिळालेला नाही. ग्रामपंचायतीकडून होत असलेल्या दुर्लक्षामुळे नागरिकांकडून संताप व्यक्त करण्यात येत असून, ही कामे तात्काळ हाती घेण्यात यावीत, अशी मागणी होत आहे.
आपटा गावातील पिंपळ आळीमधील गटारातील पाणी रस्त्यावर आले आहे, गटारे तुंबलेली असून, त्यांची अद्याप साफसफाई केलेली नाही. त्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली असून, नागरिकांना ये-जा करताना नाक धरुन प्रवास करवा लागत आहे. आपटा गावात दरवर्षी पूर येतो, त्यासाठी ठोस उपाययोजना करण्यात आली पाहिजे. पाताळगंगा नदी ही आपटा गावातील रेल्वे पूल ते जुना कोळीवाडा गावाची हद्द संपेपर्यंत नदी खोल केली पाहिजे. गावातील बापदेव मंदिराच्या जवळ जो रोड नदीच्या पाण्यातून जातो, तो बंद करुन तेथे घाट बांधला पाहिजे. नदीच्या काठावर संरक्षक भिंत उभारली पाहिजे. जर या उपाययोजना केल्या, तर पुराचे पाणी गावात भरणार नाही, असे नागरिकांचे म्हणणे आहे. पिंपळ आळीमधील रोड जो फुटला आहे, तो तातडीने दुरूस्त करावा, पथदिवे सुरू करावे, गावातील मोठे नालेसफाईच्या कामाला सुरुवात केली नाही. ही कामे होणार तरी केव्हा असा प्रश्न विचारला जातो आहे. ग्रामपंचायत सदस्य काहीच लक्ष देत नाहीत, असा आरोप नागरिकांकडून करण्यात येत आहे.