पशुवैद्यकीय अधिकार्‍यांवर कारवाई कधी?

| कर्जत | प्रतिनिधी |

स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवांतर्गत कर्जत तालुक्यातील चौदा पशुवैद्यकीय अधिकार्‍यांनी तिरंगा झेंडा फडकावला नाही. याबाबत तक्रारदार सामाजिक कार्यकर्ते दिंगबर चंदने यांनी केलेल्या तक्रारीबाबत एक वर्ष उलटून गेले तरी अद्याप पशुवैद्यकीय अधिकार्‍यांवर कारवाई करण्यात आली नाही. गतवर्षी स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव अंतर्गत हर घर तिरंगा हा उपक्रम राज्यात दि. 13 ते 15 ऑगस्ट 2022 या कालावधीत राबविण्याबाबत शासनाने आदेश पारित केले होते. यादरम्यान सर्वांनीच तीन दिवस भारतीय तिरंगा झेंडा लावणे बंधनकारक असताना कर्जत तालुक्यातील चौदा पशुवैद्यकीय अधिकार्‍यांनी तिरंगा झेंडाच फडकवलाच नाही. याबाबत सोशल मिडीयावर तसेच वृत्तपत्रात बातमी प्रसिद्ध होताच जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ.शामराव कदम यांनी गंभीर दखल घेऊन खुलासा करण्यासाठी तालुक्यातील सर्व पशुवैद्यकीय अधिकार्‍यांना कारणे दाखवा नोटीस बजावून खुलासा करण्यास सांगितले. परंतु, तालुक्यातील पशुवैद्यकीय अधिकार्‍यांनी केलेले सर्व खुलासे दि. 16 सप्टेंबर 2022 च्या पत्रानुसार अमान्य करून पुढील कारवाई करण्यासाठी प्रादेशिक पशुसंवर्धन सह आयुक्त मुंबई विभाग, युनिट 14 यांना पत्र दिले व ही बाब गंभीर असल्याने योग्य कारवाई आपल्या स्तरावर व्हावी, अशी विनंती केल्याची बाब माहितीच्या अधिकारातून उघड झाली.

तरीही कारवाई न झाल्याने तक्रारदार दिंगबर चंदने यांनी दि. 6 डिसेंबर 2022 रोजी आपले सरकार पोर्टलवर तक्रार दाखल केली होती. त्या तक्रारीची दखल दखल घेत प्रादेशिक सह आयुक्त यांनी दि. 30 जानेवारी 2023 रोजी कमिटी स्थापन करून या कमिटीचे प्रमुख म्हणून डॉ. बी.व्ही. जिचकर, सहायक आयुक्त पशुसंवर्धन मुंबई यांची नेमणूक केली होती. डॉ. जिचकर यांनी दोन वेळा चौदा पशुवैद्यकीय अधिकार्‍यांची चौकशी करून दि. 10 मे 2023 रोजी शासनाकडे अहवालदेखील सादर केला. पण आजपर्यंत कुठल्याही प्रकारची कारवाई झाली नाही तसेच याबाबत तक्रारदार चंदने यांना कुठलीही माहिती कळविण्यात आलेली नाही. नागरिकांना तिरंगा झेंडा लावण्याचे आवाहन करणारे शासन शासकीय अधिकार्‍यांवर कारवाई का करत नाही, असा प्रश्‍न तक्रारदार दिंगबर चंदने यांनी उपस्थित केला आहे.

खुलासे अमान्य करून कारवाई करण्यासाठी प्रस्ताव वरिष्ठ कार्यालयाकडे पाठवला आहे.

डॉ. शामराव कदम, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी, अलिबाग
Exit mobile version