। पनवेल । प्रतिनिधी ।
लाच घेताना रंगेहाथ पकडलेले उसर्ली खुर्द ग्रामपंचायतचे सरपंच अतुल तांबे यांना निलंबित करूनही अद्याप अंमलबजावणी का नाही ? अशी चर्चा नागरिकांत सुरु आहे.
तांबे यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकार्यांनी 2 फेब्रुवारी 2022 रोजी एका कंत्राट दाराकडून वीस हजाराची लाच घेताना पकडले होते. त्यानंतर त्यांच्यावर गुन्हा दाखल होऊन पोलिसांनी त्यांना अटक केली होती. सध्या ते जामिनावर असून त्यांना निलंबित करण्याची कार्यवाही रायगड जिल्हा परिषदेकडून सुरू करण्यात आली होती मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी या भ्रष्टाचारी सरपंचांना निलंबित करावे असा अभिप्राय विभागीय कोकण आयुक्तांना सादर केला होता. त्यानुसार विभागीय कोकण आयुक्तांच्या न्यायालयात याबाबत सुनावणी पार पडली.
यानंतर विभागीय कोकण आयुक्त यांनी महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम (1959 चा मुंबई अधिनियम क्र. 3) कलम 39(1) अन्वये श्री. अतुल अनंता तांबे, सरपंच, ग्रामपंचायत उसर्ली खुर्द, यांना त्यांच्या सरपंच पदावरून काढून टाकण्यात येत आहे. असे स्पष्ट आदेश 18 ऑक्टोंबर 2022 रोजी जारी केले आहेत.विभागीय कोकण आयुक्तांच्या आदेशाला तब्बल पंधरा दिवस उलटले तरी अद्यापही या आदेशाची अंमलबजावणी करण्यात आली नाही. दरम्यान उपलब्ध माहितीनुसार मंत्रालयातून निलंबनाच्या आदेशाला स्थगिती मिळवण्याचे प्रयत्न सरपंच तांबे करीत आहेत असे समजते.